
दोंडाईचा -
शहरात भरदुपारी चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी केली. गबाजी नगरातील शिक्षकाच्या घरातून सव्वा लाखांची रोकड लंपास केली. तर जैन कॉलनीत चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
गबाजी नगरात खोकराळे (ता. नंदुरबार) येथील जि. प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले पंकज मंगा गोसावी यांचे दुमजली घर आहे. खालच्या मजल्यावर गोसावी हे कुटंबासह राहतात तर, वरच्या मजल्यावर टाकरखेडा (ता. शिंदखेडा) येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेले दिपक भगत हे भाडेकरू म्हणून राहतात.
शिक्षक गोसावी हे त्यांचे मुळ गाव घोटाणे (ता नंदुरबार) येथे पत्नीसह शेतात गेले होते. तर तलाठी भगत हे परिवारासह हे गावी गेलेले होते. दोन्ही घरे बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. शिक्षक गोसावी यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सव्वा लाखांची रोकड चोरून नेली.
त्यानंतर तलाठी भगत यांच्या घराचे कुलूप तोडून शोधाशोध केली. मात्र, चोरांच्या हाती काही लागले नाही. दुसर्या घटनेत जैन कॉलनीतील डॉ. राजेंद्र भावसार हे यांच्याकडे घरफोडी झाली. ते नंदुरबार येथे गेलेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटाची झाडाझडती केली.
मात्र त्यांना रिकाम्या हातीच परतावे लागले. भरदुपारी घटलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.
यावेळी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नगरसेवक प्रतिनिधी जितेंद्र धनसिंग गिरासे उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
0 Comments