अमळनेर- कोकणात अतिवृष्टीमुळे बाधित शहर चिपळूण. सरकारी बातम्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचले. त्यामध्ये चिपळूण शहरात वाढलेली पाणी-पातळी, त्यातून नागरिकांचे झालेले अतोनात हाल, एकूणच प्रत्येक कुटुंबियांचे झालेले सांसारिक व वाणिज्यक नुकसान स्वाभिमानी कोकणी माणसाला कोलमडून पडायला पुरेसे होते. त्यात आणखी भर पडली संततधार पावसाची, यामुळे अनेकांची दैना उडालीच परंतु अन्न-पाण्यावाचून माणसं अक्षरशा हवालदिल झालेली पहावयास मिळाली. हो अशावेळी अवघा महाराष्ट्र संकटसमयी तात्काळ धावून गेला मात्र मदत कोणत्या स्वरुपाची पाहिजे याचा अंदाज घ्यायलाच मोठा कालावधी लागला. याचवेळी सानेगुरुजी शाळेतील शिक्षक तसेच अध्यक्ष हेमकांत पाटील यांना संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी बैठक घेऊन आपण या घटकेला अतिशय संयमाने मदत कार्यात सहभाग नोंदवू या असा सल्ला दिला.
येथूनच अतिशय नियेाजनबद्ध पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष मुंबई यांचेशी संपर्क साधून अतिवृष्टी बाधितांची सद्यस्थिती जाणून घेतली. मदत कोणत्या स्वरुपात असावी कोणत्या भागात पोहोचवावी आदी माहिती घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या निलम पालव या अनुसया महिला स्वयंसेवी संस्था चालवितात त्यांना विनंती करून गरजवंतांचे सर्वेक्षण पाहणी अहवाल आम्हाला द्यावा व आम्ही कोणापर्यंत कशा स्वरुपाची मदत पोहोचवली पाहिजे याचीही माहिती जाणून घेतली व त्यानंतर साने गुरुजी विद्यालय आणि गौरीसुत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेरातील नागरिकांना मदतीचे आवाहन केले. तसेच हे आवाहन करताना नागरिकांना आश्वस्त केले की आपण देऊ केलेली मदत आमच्या दोन्ही संस्थांमार्फत कोकणात पोहोचविण्यासाठीचा ट्रक व त्याचा दळणवळणाचा खर्च उचलणार. दोन्ही संस्थेतील पदाधिकारी व साने गुरुजी शाळेतील शिक्षक स्वखर्चाने कोकणात स्वयंसेवक या नात्याने जाऊन गरजवंतांना ही मदत स्वहस्ते देतील.या आवाहनानंतर नागरिकांनी किराणा किट, नवे जुने कपडे, अंग पुसण्याचे नवे रुमाल, अंथरुण-पांघरुण, संसारोपयोगी भांडे साने गुरुजी शाळेत जमा केले. यात अधिकची भर मंगल देव ग्रह संस्थान, गजानन महाराज परिवार, संभाजी ब्रिगेड यांनीही मोठे योगदान देऊन घातली. ही जमा झालेली मदत ट्रकमध्ये भरून साने गुरुजी विद्यालय व गौरीसुत प्रतिष्ठान या संस्थेचे पदाधिकारी ट्रक समवेत एकूण पाच दिवस कोकणात जाऊन प्रत्यक्ष घटनास्थळी मदत कार्यात सामील झाले. स्वयंसेवकात हेमकांत पाटील, संदीप घोरपडे, प्रशांत निकम, शुभम निकम, अनिकेत घोरपडे व राज पाटील हे अहोरात्र कष्ट घेत होते.
आपल्या खानदेशातील कार्यकर्त्यांची तिथे राहण्याची खाण्याची व्यवस्था अनुसया महिला संस्थेच्या पदाधिकारी निलम पालव, साक्षी पालव, रोहित शंकर भारदे यासह अनेक कार्यकर्ते हिरीरीने सहभागी होते. चिपळूण येथे बोलताना संदीप घोरपडे म्हणाले की, या अस्मानी नैसर्गिक संकट काळात कोकणी माणूस कोलमडून पडला पण पुरोगामी विचारांचा संस्कारी महाराष्ट्र या धक्क्यातून सावरण्यासाठी तात्काळ पुढेही सरसावला. ही आम्हा महाराष्ट्रीय माणसांसाठी लाख मोलाची बाब आहे. प्रत्यक्ष चिपळुणातील परिस्थिती नजरेसमोर ठेवली तर अंगभर दागिने घालून दोन घास खाण्यासाठी हात पसरावे लागतात याचा विषाद अनेकांच्या चेहऱ्यावर पाहिला. दोन घोट पाण्यासाठी नागरिक मदत कार्यातील गाडीच्या मागे धावताना पहावे लागले त्याचे दु:ख मनात घेऊन आम्ही परत जाणार. आपला वाहून गेलेला संसार सावरणे साठी एक प्लास्टिक बादली द्या अशी आर्त विनवणी हृदय हेलावून गेली. अमळनेर शहरातील एक जुनी गोधडी मिळताच लाखाची लॉटरी लागल्याचा आनंद कुटुंबप्रमुखाच्या चेहऱ्यावर झळकताना आम्ही 24 तासाच्या सततचा प्रवास व मदत कार्यातील गाडी भरतानाचे व गाडी रिकामी करतानाचे कष्ट विसरलो त्या क्षणाला मनापासून मदत जमा करणाऱ्या अमळनेरकरांना धन्यवाद दिले.
*******


0 Comments