Header Ads Widget

धुळे जिल्ह्यात १४ हजार शिधापत्रिका तात्पुरत्या निलंबित




धुळे : शिधापत्रिकेवर (Ration cards) गरीब कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून (Central and State Governments) स्वस्त धान्य योजना राबवली जात आहे. पैकी राष्ट्रीय धान्य योजनेतून सलग पाच महिने धान्य न घेतलेल्या धुळे जिल्ह्यातील १४ हजार ९०६ शिधापत्रिका पुरवठा विभागाकडून निलंबित केल्या आहेत. दरम्यान स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य बाहेर काळाबाजारात विक्री करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाईचा इशारा जिल्हा पुरवठा विभागाने दिला आहे.


संबंधित लाभार्थ्यांना योजनेतील धान्याची गरज नसल्याचे मान्य करीत ही कारवाई झाली आहे.

त्याऐवजी अन्य गरजूंना या योजनेचा लाभ देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. राष्ट्रीय धान्य योजनेत पात्र असूनही ज्या लाभार्थ्यांनी ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीत शिधापत्रिकेवर कोणतेही प्रकारे धान्य खरेदी केले नाही. अशा नागरिकांची माहिती सरकारकडून संकलित करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण पात्र लाभार्थींपैकी १४ हजार ९०६ शिधापत्रिकाधारकांनी या पाच महिन्यांत धान्यच घेतले नाही. त्यात ४५ हजार युनिटधारक आहेत. त्यांना धान्याची आवश्यकता नसल्याचे दर्शनी दिसते. या पार्श्वभूमीवर शिधापत्रिका तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित शिधापत्रिकाधारकांना कोणतेही रेशन दुकानावर धान्याचे वाटप करू नये, असे आदेश पुरवठा विभागाने दिले आहेत. ज्या निलंबित शिधापत्रिका लाभार्थ्यांना धान्याची गरज असल्यास त्यांनी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. त्यांना पुरवठा विभागाकडून धान्य वितरित होणार आहे.

आतापर्यंत ३०० लाभार्थी कुटुंबाने कार्यालयाशी संपर्क केला आहे. निलंबित शिधापत्रिकाधारकांनी तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडे आपल्या ओळखपत्राच्या पुराव्यासाठी अर्ज करावे, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. शासनामार्फत नियमित धान्यासह मोफत धान्याचे वितरण सुरू आहे. दुप्पट धान्य मिळत असल्याने बहुतांश लाभार्थी धान्याची विक्री करीत असल्याची माहिती पुरवठा विभागाला प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात असे प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यास धान्याची विक्री करणाऱ्यांची व गावात कोणत्या वाहनाने खरेदी होते याची माहिती द्यावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

दरम्यान बहुतांश नागरिकांचे शिधापत्रिका आधारकार्ड संलग्न रजिस्ट्रेशन झाले नाही. त्यामुळे आदिवासी कुटुंब धान्यापासून वंचित आहेत. यासाठी तहसील कार्यालयातर्फे गावनिहाय कॅम्प आयोजित करून शिधापत्रिका संबंधी समस्या सोडवाव्यात. तशा सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना द्याव्यात, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

तालुकानिहाय बंद शिधापत्रिका संख्या
धुळे : पाच हजार ९००, साक्री : तीन हजार २८, शिंदखेडा : तीन हजार ३३४, शिरपूर : दोन हजार, ६४४.

Post a Comment

0 Comments