Header Ads Widget

विद्यावर्धिनीचे ‘एस.पी.’ अण्णा गेले




धुळे- येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व निवृत्त शिक्षकेतर कर्मचारी सुकदेव पितांबर पाटील उर्फ एस.पी. पाटील यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी नाशिक येथे वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले. दुपारी साक्रीरोडवरील जनरल अरुणकुमार वैद्य नगर मध्ये त्यांच्या निवासस्थानी काही तास अन्त्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर आज सायंकाळी सैताणे ता. नंदुरबार या त्यांच्या मुळगावी अन्त्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या पश्चात पत्नी, बडोदा व नाशिक येथे अभियंता असलेले संदीप व योगेश ही दोन मुले व दुसाणे येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका असलेली एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

शिक्षणतज्ञ प्राचार्य नानासाहेब मा.य. वैद्य व प्रा. प्र. दा. दलाल यांनी स्थापन केलेल्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या ‘कमवा आणि शिका’ योजनेत प्रारंभीच्या बॅचचे ते लाभार्थी होते. या योजनेतून शिक्षण घेऊन ते विद्यावर्धिनी महाविद्यालयातच लिपीक म्हणून नोकरीस लागले. एव्हढेच नव्हे तर आपण जे भोगले ते गरीबांच्या वाट्याला येऊ नये म्हणून सेवा काळात अनेक गरीब विद्यार्थ्यांना ते आर्थिक मदत आणि मार्गदर्शन करीत राहिले. विद्यावर्धिनी परिवारात ते ‘एस.पी. अण्णा’ म्हणून परिचित होते. साधारणत: 1992 साल असावे. अरुणकुमार वैद्यनगर मधील अजबे यांच्या विहीरीवर पाणी भरत असतांना एक विवाहिता सौ. भारती अभिमन्यू राजपूत ही पाय घसरुन विहीरीत पडली. बघ्यांनी गर्दी केली. त्यावेळी रस्त्यावरून कॉलेजला ड्युटीला जात असलेल्या एस.पी. अण्णांनी क्षणाचाही विलंब लावत गर्दीला बाजूला सारत अंगावरील कपड्यांसहीत विहीरीत उडी घेऊन एकट्या भारतीला नव्हे तर तिच्या पोटातील बाळासह दोघांना वाचविले. त्यावेळी पुणे विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरुंनी आपल्या विद्यापीठ क्षेत्रातील महाविद्यालयाचा शिक्षकेतर कर्मचारी म्हणून त्यांचा विशेष गौरव केला होता. अठरा वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या सैताणे गावी असलेल्या शेतीवर रमले होते. स्वत: शेतीवर काम करून त्यांनी हाडाचे शेतकरी म्हणून नाव लौकिक मिळविला होता. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. अडलेल्या नडलेल्यांना मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणारे, कष्टकरी श्रमजिवी वर्गातून पुढे आलेले, सदा हसतमुख निर्मळ मनाचे असे व्यक्तीमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले.

एस.पी. अण्णा यांना माझी साश्रुनयनांनी भावपूर्ण आदरांजली

- गो. पि. लांडगे, ज्येष्ठ पत्रकार, धुळे.

 



Post a Comment

0 Comments