Header Ads Widget

धुळे:जिप सदस्य विरेंद्रसिंह गिरासे अपात्र,निविदा मंजूर करणे भोवले



चिमठाणे : चिमठाणे (ता. शिंदखेडा, जि. धुळे) जिल्हा परिषद (Zilha Parishad) गटाचे भाजपचे सदस्य वीरेंद्रसिह गिरासे यांनी पदाचा दुरुपयोग करुन मुलाच्या नावे रस्ता दुरुस्तीची निविदा (Tender) मंजूर करुन घेतल्याच्या कारणावरुन नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त (Upper Commissioner of Nashik Division) भानुदास पालवे यांनी नऊ नोव्हेंबरला हा आदेश दिला.

अशा स्वरुपाची अलिकडच्या काळातील पहिलीच घटना असून राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

जानेवारी 2020 मध्ये वीरेंद्रसिंह इंद्रसिंह गिरासे चिमठाणे जिल्हा परिषद गटातून निवडून गेले होते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या 30 एप्रिल 2020 रोजी झालेल्या मासिक सभेत शिंदखेडा तालुक्यातील आरावे फाटा ते आरावे गाव इजिमा 44 किमी/00 ते 1/100 रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्याबाबत नऊ जून 2020 रोजी आरावे ग्रामपंचायतीला सूचित करण्यात आले. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य गिरासे यांचा मुलगा इंद्रजीत वीरेंद्रसिंह गिरासे याच्या नावाने या कामाचे कंत्राट मंजूर करुन 21 जुलै 2020 रोजी त्याला कार्यारंभ आदेश देण्यात आला. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 16 (1) (आय) अंतर्गत कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याला जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार्‍या कामात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सहभागी होता येत नाही.

तसे आढळल्यास तो अपात्र ठरतो. जिल्हा परिषद सदस्य गिरासे यांनी पदाचा दुरउपयोग करुन मुलास कंत्राट मिळवून दिल्यामुळे त्यांच्या विरोधात चिमठाणे येथील भरतसिंह पारसिंह राजपूत यांनी 13 जानेवारीला शिरपूर येथील अ‍ॅड.अमित जयवंत जैन यांच्यामार्फत नाशिक येथील अप्पर आयुक्तांच्या न्यायालयात तक्रारी अर्ज दाखल केला. त्यावर कामकाज चालवतांना युक्तिवाद ऐकल्यानंतर वीरेंद्रसिंह गिरासे यांनी पदाचा दुरुपयोग करुन मुलास लाभ मिळवून दिल्याचे सिद्ध झाल्यामुळे महाराष्ट्र जि.प.व पं.स.अधिनियम 1961 च्या कलम 16 (1) (आय) व 40 मधील तरतुदींनुसार त्यांना चिमठाणे गटाच्या जिल्हा परिषद सदस्यपदावरुन अपात्र घोषित करीत असल्याचा निकाल अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments