या बँकेत गेली अनेक वर्षे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. नंदुरबार जिल्ह्यतील चारही विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, महत्त्वाच्या पंचायत समित्या आदी सर्व पदांवर आदिवासी आरक्षण आहे. अशा स्थितीत तेथील `शाहू` (बिगर आदिवासी मतदार) गटातील नेत्यांनाही किमान सहकारातील या शिर्ष संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी ही सुप्त इच्छा नेहेमीच राहिली आहे. हा सुप्त संघर्ष उघड दिसत नाही, मात्र राजकारणात तो सुप्त अवस्थेत आहे.
धुळे जिल्ह्याचे विभाजन झाल्यावर नंदुरबार स्वतंत्र जिल्हा झाला. तसेच बँकेचे विभाजन व्हावे यासाठी नंदुरबारच्या नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मात्र त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. यंदाच्या निवडणुकीत तो मुद्दा उघडपणे नाही, मात्र अंतस्थ आहेच. त्यामुळे कदाचीत विभाजनाआधीची ही निवडणुक ठरू शकते. त्याला धुळ्याच्या बिगर प्रस्थापित संचालकांचाही पाठींबा मिळण्याची शक्यता आहे.
शेजारच्या जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणूकीत सर्व पक्षीय पॅनेलसाठी प्रयत्न झाले. त्यात एकनाथ खडसे, गिरीश महाजन हे पूर्वाश्रमीचे भाजप नेते केंद्रस्थानी होते. शेवटच्या क्षणी भाजप नको म्हणून सर्वपक्षीय पॅनेल होऊ शकले नाही. धुळे- नंदुरबार बँकेत मात्र अमरीशभाई पटेल व राजवर्धन कदमबांडे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी व माजी मंत्री जयकुमार रावल असे तिन्ही सध्या भाजपमध्ये असलेले नेते पॅनेल निर्मीतीत केंद्रस्थानी होते. सर्व पक्ष त्यांच्याबरोबर गेले. त्यांना भाजपची अडचण वाटली नाही. कारण वरकरणी श्री. पटेल व कदमबांडे भाजपमध्ये असले तरी सहकारात अंतस्थ अजित पवार गटाबरोबरच असतात. फक्त त्यांना यंदा काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारीत समतोल साधता आला नाही. त्यामुळे दहा जागांवर ही निवडणूक होत आहे.
धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ७९ उमेदवारी अर्जांपैकी ५२ इच्छुकांनी माघार घेतली. यामध्ये २७ पैकी सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता दहा जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेने वेगळी चूल मांडल्याने निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला.
नव्या नेत्यांत नाराजी
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी नेत्यांनी सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली. मात्र, शिवसेनेने वेगळी चूल मांडली. त्यामुळे पॅनलमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश राहिला. सुरवातीला चार आणि सोमवारी तीन अशा एकूण सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक (नवापूर), भगवान पाटील (कापडणे), इतर मागासवर्गीय मतदारसंघातून श्याम सनेर, बिनविरोध निवडून आले. तत्पूर्वी, भाजपचे दीपक पाटील (शहादा), प्रभाकर चव्हाण (शिरपूर), भरत माळी (तळोदा), तर शिवसेनेचे आमशा पाडवी (अक्कलकुवा) हे चौघे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे सहकारात सर्वच नेते श्री. पटेल यांच्या शब्दाला मान देतात. त्यामुळी यापुर्वी चार वेळा निवडणूक बिनविरोध झाली आहे. यंदा समतोल ढळल्याने निवडणूक होते आहे.
...

0 Comments