Header Ads Widget

धुळे - लसीकरणाचे खोटे प्रमाणपत्र, आरोग्य अधिकारीसह कर्मचा-यांना अटक



धुळे,---महापालिकेच्या अब्रुचे धिंडवडे काढणारा आणखी एक गंभीर प्रकारचा कोरोना लसीकरणाच्या बोगस प्रमाणपत्राचा घोटाळा उघडकीस आला असून शहर पोलिसांनी अखेर या प्रकरणी महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.महेश मोरे याच्यासह ४ जणांना मध्यरात्री अटक केली आहे. शासनाच्या लसीकरण वेबसाईटवर थेट खोट्या नोंदी करीत या महाभागांनी तब्बल ३ हजार १९१ लोकांना लस न घेतांच प्रत्येकी ५०० ते १००० रुपयांची वसुली करीत बोगस प्रमाणपत्र तयार करुन दिल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याची माहिती आज शहर पोलिसांनी न्यायायलासमोर दिली आहे.


मनपाचा आरोग्य अधिकारी, लसीकरणाची जबाबदारी असलेले डॉक्टर, परीचारक आणि कंत्राटी कर्मचारी यांनी फौजदारी स्वरुपाचा कट करुन कोरोना सारखी महामारी रोखण्यासाठी शासनाने राबवेले लसीकरण अभियानाला हरताळ फासल्याचे यातून समोर आले आहे. महापालिकेच्या मुजोर अधिकार्यांचा हा प्रताप समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागावर धुळे शहर क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची जबाबदारी असल्याने आरोग्याधिकार्यांसह प्रमुख कर्मचार्यांना कोविड लसीकरणाच्या शासकीय वेबसाईटचे युजर आयडी व पासवर्ड सोपवले गेले आहेत. मात्र याचा गैरवापर करीत चक्क खोटे, बनावट प्रमाणपत्र विकण्याचा सपाटा लावल्याचा गंभीर प्रकार गेल्या महिन्यात समोर आला होता. याप्रकरणात महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ आणि प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न सुरु होता. मात्र स्थायी समिती सभेत सदस्य सुनिल बैसाणे, शितल नवले, नागसेन बोरसे, अमोल मासुळे यांनी हे प्रकरण उचलून धरले होते. त्याच प्रमाणे शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांच्यासह शिवसेनेने आंदोलन करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ई मेल व्दारे लेखी तक्रार केली होती. अखेर वाढत्या दबावामुळे प्रकरणाच्या चौकशीसाठी आयुक्तांनी सहाय्यक आयुक्त नारायण पंडीत सोनार यांची नियुक्ती केली, सोनार यांनी शहर पोलिसात अज्ञाता विरुध्द गुन्हा दाखल केला. पो.नि. देशमुखांनी केला सखोल तपास गुन्हा दाखल झाल्यावर विशेष चौकशी पथक नेमण्यात आले. सखोल चौकशी करीत काल दि. १४ रोजी रात्री १०.४१ वाजता मनपा आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी अमोल सुनिल पाथरे (वय२७) रा.मिशन कंम्पाऊंड, साक्रीरोड, धुळे याला अटक केली. तसेच मनपा आरोग्य अधिकारी डॉ.महेश माधवराव मोरे (वय ४८) रा.कृष्ण कमल हौसिंग सोसायटी, गोळीबार टेकडी रोड,धुळे, डॉ.प्रशांत गोविंद पाटील (वय ३६) रा.निशांत अपार्टमेंट, कामठवाडी, नाशिक आणि उमेश रविंद्र पाटील (वय २७) रा.गरताड ता.धुळे या तिघांना चौकशीअंती मध्यरात्री ३ वाजून २८ मि. अटक केली आहे. या चारही जणांना शहर पोलिसांनी अटक करुन पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. ७४ लस असतांना २०८० जणांचे लसीकरण शहरातील एस.व्ही.के.एम. कॉलेज येथील लसीकरण केंद्रात दि. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी चार जणांनी संगनमत करुन शासकीय वेबसाईटवर जनरेट केलेला युजर आयडी व पासवर्ड अशा ओखळदर्शक चिन्हांची चोरी करुन त्याव्दारे तोतेयेगिरी करुन दि. २८ ऑक्टोबर कोविड लसीकरणासाठी मनपा आरोग्य विभागाला कोविशिल्ड लसीच्या ७४ लस मात्रा दिलेल्या असतांना त्यात २ हजार ८० लसीकरणाची वाढ केली. दि.४ डिसेंबर आणि दि. ६ डिसेंबरला एस व्ही के एम कॉलेज येथे मनपाकडून लसीकरण प्रत्यक्ष केलेले नसतांना कोविशिल्ड च्या एकुण १ हजार १११ लोकांना लस मात्रा दिल्याच्या नोंदी करुन बनावट लसीकरण प्रमाणपत्र जनरेट करण्यात आले. ज्या लोकांनी लस घेतलीच नाही अशा लोकांना लसीकण पुर्ण केल्याचे ऑनलाईन बनावट प्रमाणपत्र तयार करुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी धुळे महापालिका व शासनाची फसवणुक केली. एकुण ३ हजार १९१ लोकांना अशा प्रकारे बनावट इलेक्ट्रॉनिक प्रमाणपत्र मनपा आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या या चारही जणांनी संगनमत करुन प्रत्येकी ५०० ते १००० रुपये घेवून वितरीत केले असल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याची माहिती सुध्दा पो.नि. देशमुख यंानी आज धुळे न्यायालयाला सादर केलेल्या चौकशी अहवालात नमूद केली आहे. अतिसंसर्गजन्य कोविड-१९ या रोगाचा प्रसार होण्याची घातक व मानवी जिवितास धोकादायक अशी हयगईची कृती आणि साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७चे उल्लघंन मनपा आरोग्य अधिकारी डॉ.महेश मोरे याच्यासह ४ प्रमुख आरोपींनी केले असल्याचे या चौकशीतून निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर भादवि कलम १२०(ब), २६९, २७०, ४६५, ४६६, ४६८, ४७१, सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे उलंघन केले म्हणून कलम ३,४ लावण्यात आले असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments