दोंडाईचा, जि. धुळे : वीस वर्षांपूर्वी मंजूर असणारी प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेत ३२ किलोमीटर जाणारी पाइपलाइन चार टप्प्यांत केली जाणार आहे. या कामास प्राधान्य दिल्यास पाइपलाइनखाली येणाऱ्या अनेक नाल्यांत पाणी टाकणे शक्य होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील शनिमांडळ तलाव व चौथ्या टप्प्यातील बुराई मध्यम प्रकल्प अस्तित्वात आहेत. येथे कोणताही खर्च करण्याची गरज नाही. पहिल्या, दुसऱ्या टप्प्यातील तलावांची निर्मिती, भूसंपादन करावयाचे आहे. तोपर्यंत शेवटच्या टप्प्यात पाइपलाइनद्वारे पाणी टाकता येऊ शकते. यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रथम पाइपलाइनच्या कामाला प्राधान्य दिल्यास धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे ५० गावांचा पाणीप्रश्न सुटू शकतो.
पहिला टप्पा हाटमोहिदा ते निंभेल, दुसरा टप्पा निंभेल ते आसाणे, तिसरा टप्पा असाणे ते शनिमांडळ, चौथा टप्पा शनिमांडळ ते बुराई मध्यम प्रकल्प, अशी ३२ किलोमीटर अंतराची पाइपलाइन टाकली जाणार आहे. यासाठी नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागाने पाइपलाइन, पंपगृहे, पंपिंग मशीनरीसाठी केंद्र शासनाच्या नाबार्ड अंतर्गत बळीराजा जलसंजीवनी योजनेत पावणेदोनशे कोटींचा स्वतंत्र प्रस्ताव सादर केला होता. मात्र योजनेला चालना देण्यासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध झाला नाही. दरम्यान, ठेकेदाराची कामाप्रती असलेली उदासीनतेमुळे योजनेला गती मिळाली नाही. परिणामी ३२ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनलगत असणारी गावे आजही दुष्काळाचे चटके सहन करीत आहेत.
चौथ्या टप्प्यातील बुराई मध्यम प्रकल्पाची उंची वाढविणे मूळ योजनेत प्रस्तावित होते. तेथे १८.६६ दशलक्ष घनमीटर पाणी टाकण्याचे नियोजन होते. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार होता. त्यास शेतकऱ्यांचाही विरोध होता. त्यात बदल करून तिसऱ्या व चौथ्या टप्प्यादरम्यान जाणाऱ्या पाइपलाइनखाली नैसर्गिक उताराने लघुपाटबंधारे योजनेतील अमरावती नाल्यात २.६६ दशलक्ष घनमीटर पाणी, मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पात १०.०० दशलक्ष घनमीटर पाणी, वाडीशेवाडी मध्यम प्रकल्पात ६.०० दशलक्ष घनमीटर पाणी टाकण्याचा अंतर्भाव २०१८ मध्ये केला आहे. त्याचा फायदा शिंदखेडा तालुक्यात शेकडो एकर शेती सिंचनासाठी होणार आहे.

0 Comments