Header Ads Widget

*कै. वसंतराव धर्माजी पाटील (वासू आप्पा) यांच्या २२वा पुण्यस्मरणदिन कृतज्ञता दिवस म्हणून साजरा*

-------------------------------------------------
पाष्टे | साने गुरुजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पाष्टे येथे संस्थेचे संस्थापक कै. आप्पासाहेब वसंतराव धर्माजी पाटील उर्फ वासू आप्पा यांच्या २२ व्या पुण्यस्मरणदिनाचे औचित्य साधून कृतज्ञता दिवस अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गावाच्या शैक्षणिक उभारणीसाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या या दूरदर्शी कर्मयोगी आप्पांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विद्यार्थ्यांपासून ग्रामस्थांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पाष्टे गावाचे माजी सरपंच *बापूसाहेब श्री मधुकर शिरसाठ* यांनी भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात वासू आप्पांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून झाली. उपस्थित सर्व मान्यवरांनी आप्पांच्या कार्यास अभिवादन करत श्रद्धांजली अर्पिली.
 विद्यमान अध्यक्ष *आबासाहेब श्रीराम जवागे* यांनी आपल्या मनोगतातून आप्पांच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, “सन १९६७ पर्यंत पाष्टे गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी बेटावदपर्यंत पायी जात होते. त्या काळात शिक्षणाची गरज ओळखून गावात सर्वप्रथम शाळा उभी करण्याचे धाडस व दूरदृष्टी वासू आप्पांनी दाखवली. आज ही संस्था पंचक्रोशीतील गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून नावारूपाला आली आहे, हे आप्पांच्या त्यागाचे फलित आहे.”आबासाहेबांनी पुढे विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रगतिशील विचार, शिस्त, कष्ट आणि समाजाप्रती कृतज्ञता हे आप्पांच्या जीवनातील महत्त्वाचे धडे असल्याचे सांगितले.लोकनियुक्त सरपंच *नानासाहेब श्री मोतीलाल वाकडे* यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आप्पासाहेब हे राजकारणातील आमचे आदर्श. त्यांच्या भूमिकेने, साधेपणाने आणि लोकाभिमुख वृत्तीनेच आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत आले. गावाच्या विकासकामात आजही त्यांची परंपरा प्रेरणादायी आहे.” यानंतर माजी सरपंच श्री मधुकर शिरसाठ, यांनी आप्पासाहेब हे माझ्या वडिलांचे जिवलग मित्र होते मला मात्र ते पितृतुल्य होते आमची दोघांची राजकीय मते जरी वेगळे असले तरी मन एकच होतं गावाच्या विकासासाठी सुखदुःखात आम्ही एकत्रच असायचो, त्यानंतर माजी शिक्षक श्री महाजन सर, श्री पी. एस. जाधव सर, श्री नितीन बैसाणे सर यांनीही आप्पांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलूचे महत्व स्पष्ट केले. सर्वांनी एकमताने हे सांगितले की, वासू आप्पांनी केवळ शाळा उभी केली नाही, तर गावात शिक्षणाची ज्योत चेतवली. त्यांचे व्यक्तिमत्त्व संवेदनशील, नम्र आणि .समाजाभिमुख होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वाय. एस. सनेर यांनी केले. सनेर सरांनी सादर केलेलं आप्पांच्या जीवनावर आधारित हृदयस्पर्शी *भावकाव्य* उपस्थित सर्वांना भावलं आणि सर्वांकडून दाद मिळाली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री एस. एल. ठाकरे यांनी मानले 
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चेअरमन आबासाहेब श्रीराम जवागे, सरपंच मोतीलाल वाकडे, माजी सरपंच मधुकर शिरसाठ ,माजी सरपंच लक्ष्मण पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री रघुनाथ महाजन, लोटन पाटील, नाना पाटील, पिंटू कोळी, संतोष जाधव, विनोद पाटील रशीद पिंजारी, पत्रकार किशोर सोंजे,  संतोष पाटील, जिजाबराव पाटील, पूनम पाटील, कपिल पाटील, रवींद्र साळुंखे किशोर ठाकरे, योगेश सोंजे यांची उपस्थिती लाभली.
मुख्याध्यापिका श्रीमती. पल्लवी पाटील मॅडम, माजी शिक्षक श्री एम एस पाटील सर. श्री पी.एम सुर्यवंशी सर श्री मलखडे सर श्री शिरसाठ सर श्री काशिनाथ देसले श्री अशोक शिरसाठ तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून वासू आप्पांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच त्यांचा त्याग, त्यांची शैक्षणिक दृष्टी आणि गावाच्या विकासातील योगदान पुन्हा एकदा सर्वांना स्मरले. कृतज्ञता आणि आदराने भारलेले वातावरण या स्मृतीदिनाला खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरवणारे होते.

Post a Comment

0 Comments