अमळनेर- विजयी विश्व तिरंगा प्यारा,झेंडा उँचा रहे हमारा...या देशभक्तिपर गीताप्रमाणे 105 फुट उंचावरील तिरंगा राष्ट्रध्वज अमळनेर शहरात 26 जानेवारी 2021 प्रजासत्ताक दिनापासुन अभिमानाने फडकणार असून यानिमित्ताने अमळनेर शहराची महाराष्ट्र राज्यात एक नवीन ओळख निर्माण होणार आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पलता पाटील यांच्या प्रयत्नाने,मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड व सर्व नगरसेवक यांच्या सहकार्याने आणि माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या संकल्पनेतुन हा नाविन्यपुर्वक उपक्रम अमळनेर शहरात साकारला आहे.विशेष म्हणजे 100 फुटाच्या वर हा ध्वज असल्याने नियमानुसार या ध्वजाला दररोज सायंकाळी खाली उतरविण्याची गरज नसून कायमस्वरूपी 24 तास हा ध्वज अभिमानाने फडकत राहणार आहे.महाराष्ट्रात काही ठराविक ठिकाणीच असे 100 फुटापेक्षा अधिक उंचीवरील तिरंगा ध्वज असून त्यात आता अमळनेरची भर पडल्याने ही अभिमानास्पद बाब आहे.ध्वजसंहितेनुसार इतर ठिकाणी 100 फुटापेक्षा कमी उंचीवर असलेले राष्ट्रध्वज दररोज सकाळी राष्ट्रगीताने चढविण्यात येऊन सायंकाळी सूर्यास्ताआधी राष्ट्रगीत सादर करुनच उतरविले जात असतात. मात्र 100 फुटापेक्षा अधिक उंचीवर ध्वज असल्यास त्यास सायंकाळी उतरविण्याची आवश्यकता नसते. केवळ रात्रीच्या सुमारास देखील तो उजेडातच फडकला पाहिजे असा नियम असल्याने हा तिरंगा चौक कायमस्वरपी रात्रीच्या सुमारास झगमगत राहणार आहे.
⭕भव्य ध्वजस्तंभ उभारताना पाहणाऱ्यांची झाली गर्दी...
सदर तिरंगा ध्वज फडकविण्यसाठी पुणे जिल्ह्यातून अतिशय मजबूत पद्धतीने बनविलेला 105 फूटी ध्वजस्तंभ. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधीच अमळनेरात दाखल झाल्याने धुळे येथून विशेष क्रेन बोलावून कुंटे रोडवरील सुशोभीकरण होत असलेल्या पन्नालाल चौकात काल सायंकाळी अतिशय कौशल्याने हा स्तंभ बसविण्यात आला.यावेळी काही वेळ मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन पाहणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
यावेळी ध्वजाच्या चौथ-याचे पूजन माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील व नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेवक श्याम पाटील,शेखा मिस्तरी,महावीर पहाडे,बाळू कोठारी, जितेंद्र कटारिया,शितल कोठारी,स्नेहल कोठारी,श्री. वाणी,सुभाष भोई,महेश जोशी यासह पदाधिकारी आणि नगरपरिदेचे कर्मचारी उपस्थित होते.
⭕ ध्वजसंहितेची अंमलबजावणी करण्यास पालिका कटिबद्ध..
सदर भारताचा राष्ट्रध्वज माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या सूचनेनुसार भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रध्वजाविषयी आदरभावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेच्या वतीने अमळनेरात लावण्यात आला असून हा ध्वज 2006 मधील सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणीसह राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा राखून स्पष्टपणे दिसेल अश्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे.यासअमळनेर नगरपालिकेने 12 जानेवारी 2021 च्या सर्वसाधारण सभेत नगरपरिषद निधीतुन प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली होती.नियमानुसार राष्ट्रीय ध्वज रात्रीच्या वेळी प्रकाशझोतात राहिल अशी व्यवस्था असून ध्वज काही करणास्तव फाटला अथवा खराब झाल्यास त्वरित बदलविण्यात येणार आहे.ध्वज संहिता 2006 मधील सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यास पालिका कटिबद्ध असल्याचे पत्र लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पलता पाटील यांनी जळगांव जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
⭕ मा.आ.साहेबराव दादांच्या उपक्रमात अजुन एक नवीन भर...
माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी अमळनेरात राजकीय श्रीगणेशा केल्यापासुन आजपर्यंत अनेक नविन्यपूर्ण विकासात्मक उपक्रम अमळनेर शहरास देऊन शहराची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासह विकासाला मोठा हातभार लावला आहे.यात बळीराजा स्मारक,जिजाऊ प्रवेशद्वार आणि आता 105 फूटी तिरंगा ध्वजाचा समावेश यात होणार आहे,याव्यतिरिक्त बोरी नदिवरील पुल, रेल्वे उड्डान पुल,पोलिस अधिकारी व कर्मचारी वसाहत,आधुनिक महिला जिम,नियोजित दगडी दरवाजाचे नवीन सुशोभकरण,तांबेपुरा रेल्वे बोगदा आदी भरीव कामेही त्यांनी मार्गी लावली आहेत.
⭕ अमळनेरच्या सौंदर्यात पडणार नवीन भर...
प्रताप तत्वज्ञान केंद्र ,संत सखाराम महाराज संस्थान , मंगळ मंदिर , अंबर्षी टेकडी , सती माता मंदिर आदींसह आता 105 फूट तिरंगामुळे अमळनेरच्या वैशिष्ट्यात भर पडणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये देशभक्ती जागृत होईल. शक्य झाल्यास 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण होईल अन्यथा आठ दिवसात संपूर्ण चौक सुशोभीकरण होऊन कायमस्वरूपी तिरंगा लावण्यात येणार असल्याची माहिती मा.आ.साहेबराव पाटील अमळनेर यांनी दिली.
0 Comments