Header Ads Widget

‘‘काम नई ते काय करू? नवं लुगडं दांड्य करूं’’ असं करण्यापेक्षा जेथे काम आहे त्या कामात ‘पाणी’ दाखवा, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनो



धुळे- येथील साक्रीरोडवरील मलेरिया ऑफीस मागे सप्तश्रृंगी मंदीराजवळ (लक्ष्मीनारायण मंदीर रोडवर) आपल्या घामाच्या थेंबांनी चार पाच मजुरांनी, चार-पाच फुट खड्डा, चार चौघांसमोर, चार-पाच वेळा खोदून व्हॉल्व दुरुस्ती करूनही अंतिमसमयी थडगेसदृश्य पॅक करून व्हॉल्व लिकची कायमस्वरुपी दुरुस्ती झाल्याचा दावा करून महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मोकळा झाला होता. परिसरातील रहिवाशांनी पाणीपुरवठा विभागाच्या या तत्परतेबद्दल (!) वृत्तपत्र व समाजमाध्यमांवर जाहीर आभारही मानले होते. परंतु ‘आपण सारे भाऊ भाऊ’ या कारभारामुळे तज्ञांनी (!) केलेल्या व्हॉल्व दुरुस्तीचा बोजवारा उडाला आणि कालपासून त्या थडग्यातून  नेहमीप्रमाणे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली खरीच पण त्या पाण्याने समोरच असलेल्या मोकळ्या प्लॉटसवर निसर्गाच्या अपुऱ्या पडलेल्या पावसामुळे काटेरी बाभळं, वेडी बाभळ, काँग्रेस गवत कोमजू पहाणाऱ्या वनस्पतींना जीवदान मिळाले आणि ती डोलू लागली. डेंग्युचा फैलाव करणाऱ्या जीवजंतुंना रान मोकळे झाले. शेवटी त्या जीव जंतूंनाही ‘जीव’ आहेच की त्यांनी तरी जावे कुठे?

संबंधित व्हॉल्व आणि पाणीपुरवठा खाते यांची सध्या ‘काँटे की टक्कर’ सुरु आहे. पाहु या या लढतीत कोण कुणाचा ‘निकाल’ लावतो? एकाच व्हॉल्वची दुरुस्ती तरी कितीदा व्हावी? या विभागात तज्ञ जाणकार आहेत की नाही? अरे भावांनो!, नको तेथे कामे शोधून, ‘काम नई ते काय करू? नवं लूगडं दांड्य करू’ असं करण्यापेक्षा एकदा या नादुरुस्त व्हॉल्वची कायमस्वरुपी दुरुस्ती करून आपले पाणी दाखवा आणि व्हॉल्व नादुरुस्तीमुळे दोन घोट पाण्यापासून वंचित राहणाऱ्या पण नियमित ‘पाणीपट्टी’ भरणाऱ्या परिसरातील रहिवाशांना नियमित दोन घोट पाणी मिळू द्या. अन्यथा परिसरातील रहिवाशांना ‘गांधीगिरी’ केल्याशिवाय पर्याय राहणार नाही याची नोंद घ्यावी.

- गो. पि. लांडगे,  धुळे. मो. 9422795910

 

*******

Post a Comment

0 Comments