धुळे- समाजात एकीकडे लोभी व स्वार्थी वृत्ती वाढत असतांनाच विरदेल ता. शिंदखेडा येथील कन्या व जैताणे ता. साक्री येथील सून सौ. कल्पना नारायण न्याहळदे यांनी त्यांना रस्त्यात सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांना परत करून समाजापुढे इमानदारीचा व प्रामाणिकपणाचा जणू एक नवा आदर्शच घालून दिला आहे.
याबाबत हकिगत अशी की, सध्या नाशिक येथे रहिवास असलेल्या सौ. कल्पना न्याहळदे या दि. 23/09/2021 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्रसाद मंगल कार्यालयाकडून आकाशवाणी भाजी मार्केटकडे दुचाकी वाहनाने भाजीपाला घेण्याकरिता जात असतांना प्रसाद मंगल कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या भाजी मार्केटचे ठिकाणी भाजी घेण्यासाठी दुचाकी वाहन थांबवुन भाजी घेत असतांना त्यांना पायाजवळ एक सोन्यासारखी चैन फास निघालेली चैन पडलेली मिळुन आल्याने ती सदरची चैन उचलुन त्यांनी डी. के. नगर पोलीस चौकीच्या मागे असलेल्या राजकमल नावाचे सोनाराचे दुकानात जावून दुकान मालक यास सदरची सोन्यासारखी दिसणारी चैन ही सोन्याची आहे का याबाबत खात्री केली असता सदर दुकान मालक याने सदरची चैन ही सोन्याची असुन ती 15 ग्रॅम 400 मिलीग्रॅम अंदाजे इतके वजनाची असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी सदर बाबत त्यांचे पती शिर्डी येथे ट्रॅफीक विभागाचे पोलीस निरीक्षक असलेले नारायण सखाराम न्याहळदे यांना फोनद्वारे सांगितले असता, त्यांच्या सूचनेवरून त्यांनी सदरची चैन गंगापुर पोलीस ठाणे, नाशिक शहर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाझ शेख यांच्या ताब्यात दिली. सदरची सोन्याची चैन पोलीस स्टेशनला जमा केली.
सौ. कल्पनाताई नारायण न्याहळदे या दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त उपसभापती व विरदेलचे माजी उपसरपंच साहेबरावनाना पेंढारकर यांच्या कन्या तसेच जैताणे ता. साक्री येथील प्रगतीशील शेतकरी, ज्येष्ठ समाजसेवक, विठ्ठल मंदीर संस्थानचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. स्वर्गवासी सखाराम हिराजी न्याहळदे यांच्या सून आहेत. न्याहळदे दांपत्याच्या प्रामाणिकपणा व सचोटीचे पोलीस विभागासह सर्वत्र कौतुक होत आहे. प्रामाणिकपणाबद्दल गंगापूर पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन सौ. कल्पनाताईंचे कौतुक केले.

0 Comments