जळगावबरोबरच शेजारच्या धुळे-नंदूरबार जिल्हा बँकेचीही निवडणूक प्रक्रीया सुरु आहे. येथे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. येथे आज दुपारी सर्वपक्षीय पॅनेल निर्मितीसाठी बैठक होत आहे. त्यात भाजपचे अमरीशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, राजवर्धन कदमबांडे, आमदार विजयकुमार गावित हे नेते प्रमुख आहेत. त्या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत रघुवंशी (शिवसेना), आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी (काँग्रेस), आमदार शिरीष नाईक आदी प्रमुख मंडळी सहभागी होणार आहेत. अपवाद वगळता प्रमुख गटांत बिनविरोध निवड व्हावी असे प्रयत्न आहेत. यामध्ये आपल्याला संधी मिळावी म्हणून कालपासून नेत्यांनी आपल्या समर्थक इच्छुकांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यात राजकीय वितुष्ट असतानाही त्यांनी सर्वपक्षीय पॅनेलसाठी बैठक घेऊन एकत्र आले होते. मात्र शेवटच्या क्षणी भाजपबरोबर न जाण्याचा निर्णय झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपला दूर ठेवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. त्यासाठी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे राजकीय सुड म्हणून ईडी, सीबीआय, ईनकम टॅक्स अशा केंद्रीय संस्थांचा ससेमीरा लावल्याने अजित पवार संतप्त असल्याचे कारण देण्यात आले. मग हे सूत्र सीमा ओलांडताच सुरु होणाऱ्या धुळे, नंदुरबार जिल्ह्याला लागू होत नाही का? असा संभ्रम पसरला आहे. जळगावला भाजप नको, धुळ्याला तो हवा हवासा झाल्याने तो चर्चेचा विषय आहे.
धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक १७ जागांच्या निवडणुकींतर्गत आतापर्यंत तीस इच्छुक उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले. त्यात सोमवारी ४७ अर्ज दाखल झाले. धुळे जिल्ह्यातून ३२, तर नंदुरबार जिल्ह्यातून १८ अर्ज दाखल झाले. यातही चौदा उमेदवारांनी २५ अर्ज दाखल केले आहेत. या प्रक्रियेत आजी-माजी आमदार, संचालकांचाही समावेश आहे. ही निवडणूक सर्वपक्षीय पॅनलद्वारे बिनविरोध करण्याचे नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत माघारीवेळी चित्र स्पष्ट होऊ शकेल.
एकूण अर्जांची स्थिती
सुरवातीचे तीन अर्ज वगळता सोमवारी निर्धारित वेळेत आजी- माजी आमदार, संचालकांसह ४७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. विविध राजकीय पक्ष, सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींमधून काहींनी दोन, तीन, तर काहींनी चार अर्ज दाखल केले. त्यानुसार आतापर्यंत तीस उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा बँकेच्या येथील मुख्य कार्यालयातील निवडणूक कक्षात सोमवारी प्रामुख्याने धुळे जिल्ह्यातून बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, सुरेश रामराव पाटील, श्यामकांत सनेर, अनिकेत पाटील, प्रभाकर चव्हाण, हर्षवर्धन दहिते, डॉ. दरबारसिंग गिरासे, डॉ. एस. टी. पाटील, भगवान पाटील, तर नंदुरबार जिल्ह्यातून आमदार शिरीष नाईक, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, दीपक पाटील, आमशा पाडवी, भरत माळी यांच्यासह अन्य इच्छुकांनी अर्ज दाखल केले. ही निवडणूक बिनविरोध होण्यापूर्वी प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी समर्थकांसह पात्र लोकप्रतिनिधींना अर्ज दाखल करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली.
बुधवारपर्यंत अर्ज स्वीकृती
धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडीच्या निवडणुकीचा कार्यक्रम असा : अर्ज विक्री व दाखल प्रक्रियेची अंतिम मुदत २० ऑक्टोबरपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत, अर्जांची छाननी : २१ ऑक्टोबरला सकाळी अकरापासून, विधीग्राह्य अर्जांची प्रसिद्धी- २२ ऑक्टोबर, माघार- २२ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत, चिन्हवाटप- ९ नोव्हेंबरला सकाळी अकरापासून, मतदान- २१ नोव्हेंबरला निर्धारित केंद्रात सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत, मतमोजणीसह निकाल : २२ नोव्हेंबरला सकाळी आठपासून.
...

0 Comments