धुळे : 'ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह' अंतर्गत शहरासह जिल्ह्यात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
वेगवेगळ्या भागांत होणाऱ्या अपघातांमध्ये मद्यपान करून वाहने चालविण्याऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. यामुळे गंभीर अपघात (Accident) होऊन संबंधित वाहनचालकांसह इतरांचा जीवही जाण्याची दाट शक्यता असते. या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्याचा आदेश पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील व अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानुसार शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
दोन महिन्यात ३५४ कारवाई
रात्रीच्या वेळी शहराच्या विविध रस्त्यांवर विशेष मोहीम राबवून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. 'ड्रंक अँड ड्राईव्ह' (Drink and drive) अंतर्गत नोव्हेंबर २०२१ मध्ये १४८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यात आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक २७, त्यापाठोपाठ धुळे तालुका १८ तर शहर वाहतूक शाखेच्या अखत्यारीत १७ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली. तसेच डिसेंबर २०२१ मध्ये २०६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली. देवपूर पश्चिम पोलिस ठाण्याअंतर्गत सर्वाधिक २८, शहर वाहतूक शाखेच्या हद्दीत २१, तर चाळीसगाव (Chalisgaon) रोड पोलिस स्टेशन अंतर्गत १७ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली.
जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांकडून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. कारवाई करून त्यांच्यावर न्यायालयात खटले दाखल झाले आहेत. शहरात सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता राऊत, प्रवीण नागरे, अतुल पवार, मतीन शेख, रवींद्र ठाकरे, प्रसन्न पाटील, उमाकांत खापरे, धोंडिराम मुड्डे, दीपक दामोदर, मनोहर महाले, जितेंद्र आखाडे आदींच्या पथकाने कारवाई केली.
0 Comments