साक्री- सामाजिक व आर्थिक चळवळीचा आत्मा व कणा असलेल्या ग्राहकांच्या जागृती व संघटनेतून शोषणमुक्त भारत उभा राहू शकतो हे ग्राहक तिर्थ बिंदू माधव जोशीं यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्राहक पंचायत काम करत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य बी. एम्. भामरे यांनी केले. साक्री तहसील कार्यालय व साक्री तालुका ग्राहक पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "जागतिक ग्राहक दिनाच्या" कार्यक्रमात प्रमूख मार्गदर्शक म्हणून साक्री तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्राचार्य बी.एम् भामरें बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री चे नायब तहसीलदार संदिप सोनवणे,साक्री पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश गावीत, साक्री तालुका प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ पारख, तालुका ग्राहक पंचायतीचे सचिव व निसर्ग मित्र समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देसले, सामाजिक कार्यकर्त्या व ग्राहक पंचायतीच्या सदस्या जोशिला पगारिया,अन्य सदस्यांत सुहास सोनवणे,अनिल अहिरे व मनोहर भामरे उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य भामरे पुढे म्हणाले की, आपल्या देशात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी पासून आचार्य शुक्राचार्य व आर्य चाणक्यांनी ग्राहकांच्या हक्क व कर्तव्याची,व्यापाराचे नियम, वजन- मापे व वस्तूचे उत्पादन मुल्यादिचे निकष व सूत्रे सांगितली होती.या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर अमेरिकेत जॉन एफ्.केनडी यांनी 15 मार्च 1962 साली अमेरिकन काँग्रेसला एक संदेश पाठवून ग्राहकांच्या अधिकारांना सशक्त बनविणे व जागृतीचा विचार मांडला,ज्याला 1983 पासून मान्यता मिळाली, तेव्हा पासून जागतिक ग्राहक दिन साजरा केला जावू लागल्याचे सांगून या काळात महाराष्ट्रात ग्राहक तिर्थ बिंदू माधव जोशीं यांनी 6 सप्टेंबर 1974 ला ग्राहक पंचायतीची स्थापना करून पुढे आपल्या अथक प्रयत्नांनी 24 डिसेंबर 1984 ला ग्राहक संरक्षण कायदाच केंद्रात मंजूर करून ग्राहकांना शोषण मुक्तीची कवच कुंडले प्रदान केलीत. ज्या कायद्याची युनोस्कोनेही दखल घेत स्तुती केल्याचे सांगितले व या कायद्या अंतर्गत त्रिस्तरीय न्याय व्यवस्था असून तिचाही स्पष्ट खुलासा करत ह्या सा-या बाबी ग्राहक या नात्याने आपण समजून घ्यायला हव्यात असे आवाहन करत हिच खरी ग्राहक जागृती व ग्राहक दिन साजरा केल्या सारखे होईल असे स्पष्ट केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात नायब तहसीलदार संदिप सोनवणे यांनीही ग्राहक जागृती ही काळाची गरज असल्याचे सांगून साक्री तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्राचार्य बी.एम् भामरेंनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल व पदाधिका-यांनी केलेल्या प्रयत्नांप्रती आभार व्यक्त केलेत.साक्री तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात, अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प्रारंभीच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली, ज्याचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन अनील अहिरे यांनी तर आभार प्रदर्शन सुहास सोनवणे यांनी केले. यशस्वीतेसाठी कचेरीच्या पुरवठा,आदि विभागाचे सोनवणे,कोळी ,साळुंखे,नांद्रे व गांगुर्डे आदि पदाधिकारीनी परिश्रम घेतले.

0 Comments