Header Ads Widget

शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील विविध गावांसह दुर्गम गाव, पाड्यात बंगाली व अन्य बोगस डॉक्टरांनी धुमाकूळ



वकवाड (जि. धुळे) : शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील विविध गावांसह दुर्गम गाव, पाड्यात बंगाली व अन्य बोगस डॉक्टरांनी  धुमाकूळ घातला आहे. वकवाड, दुर्बड्या, शेमल्या, मोहिदा, उर्मदा, पनाखेड, खैरखुटी, बटवापाडा यांसह अन्य गावांतील रुग्णांना ओव्हरडोस देऊन बोगस डॉक्टरांकडून उपचार होत असल्याने रुगणांचा जीव धोक्यात असल्याने पनाखेड येथील ग्रामस्थांकडून तालुका वैद्यकीय अधिकारी (शिरपूर) डॉ. राजेंद्र बागूल यांच्याकडे बोगस डॉक्टरांविषयी लेखी स्वरूपात तक्रार आल्याने त्यांनी तक्रारीची दखल घेत बुधवारी ता‌ ६) जिल्हा आरोग्याधिकारी (धुळे) डॉ. नवले यांच्यासह सांगवी पोलिस ठाण्याच्या पथकासह पनाखेड येथे दाखल झाले. 

मात्र बोगस डॉक्टरांना याची आधीच चाहूल लागल्यामुळे दवाखाना बंद करून ते फरारी झाल्याचे निदर्शनास आले. गावात फिरून चौकशी करण्यात आली. बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील व त्यांच्याविरुद्ध शोधमोहीम सुरू आहे. बोगस डॉक्टर लोकांना खरे डॉक्टर असल्याचे सांगत होते. त्यांचाही दवाखाना कारवाईच्या भीतीपोटी बंद आढळल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

वास्तविक परिसरात सांगवी, वकवाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही काही गावांमध्ये बोगस डॉक्टरांनी गावातील कान्याकोपऱ्यात भाड्याने घर घेऊन कसलीही वैद्यकीय पदवी नसताना गावातील काही तोतया पुढाऱ्याच्या आशीर्वादाने राजरोसपणे दवाखाने थाटले आहेत. अशा बोगस डॉक्टरांकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देत कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. या बोगस डॉक्टरांकडून रुग्णाच्या जिवाचे काही बरे-वाईट झाले, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Post a Comment

0 Comments