Header Ads Widget

धुळ्यात बसस्थानकात व दुकानात घुसून महिलांच्या सोनपोत लंपास



धुळे : शहरातील बसस्थानकातून एका महिलेच्या बॅगेतून चोरट्यांनी दीड लाखांची सोनपोत तसेच देवपुरात दुकानात घुसून महिलेची ५० हजार रुपये किमतीची सोनपोत लंपास केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या.

याप्रकरणी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत करिश्मा सागर भामरे ( रा. अक्षय कॉलनी,वलवाडी शिवार,गोंदूररोड धुळे ) या १८ मे रोजी सायंकाळी बसस्थानकात गेल्या असता, चोरट्याने त्यांच्या बॅगेची चेन उघडून १ लाख ५३ हजार ८७९ रुपये किमतीची सोनपोत व एक त्रिकोणी आकाराचे पदक चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी त्यांनी २३ मे रोजी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल डी. एम. साळुंखे करीत आहेत.

दुकानात घुसून सोनपोत लंपास


शहरातील देवपुरात गणराया कॉलनीत असलेल्या एका दुकानात थंडपेय घेण्याच्या बहाणा करून आलेल्या दोन अनोखळी दुचाकीस्वारांनी प्रज्ञा योगेश कासार यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेल्याची घटना २३ मे रोजी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रज्ञा कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवपूर पोलिस स्टेशनला दोन अज्ञात दुचाकीस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक आर. एस. इंदवे करीत आहे.

Post a Comment

0 Comments