*धुळे* जिल्ह्यात नेहमीच अजिबोगरीब घटना घडत असतात. त्यापैकी एक घटना सध्या खूप गाजत आहे, ती म्हणजे तोतया जीएसटी अधिकारी बनून पोलिस गाडी घेवून हायवेवर मालवाहू वाहने अडविणे आणि त्यांना जबरी जीएसटी दंडाची भिती दाखवून मोठ्या रकमांची खंडणी वसूल करणे. या आधी तोतया पोलीस इन्सपेक्टर, तोतया आरटीओ अधिकारी, तोतया फूड अॅन्ड ड्रग्ज अधिकारी, तोतया इन्कमटॅक्स अधिकारी, असे प्रकार आपण पाहीले आहेत. आता हायवेवर पोलिसांची गाडी पथक घेवून खंडण्या खाणारा तोतया जीएसटी अधिकारी बघणे बाकी होते. ती पूर्तता धुळे जिल्हाने पूर्ण केली. विशेष म्हणजे पोलिस दलाची खरी खुरी गाडी वापरून खऱ्या खुऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे कांड केले.ही अति गंभीर बाब आहे. हे प्रकार अजुन किती दिवस सुरु राहिले असते. त्यांच्या दुर्देवाने धुळ्यात श्रीकांत धिवरें सारखे पोलिस अधीक्षक बदलून आले. त्यांनी स्वत:च्या खात्यातील मंडळी यात गुंतली असली तरी कोणतीही तडजोड न करता प्रकरण गांभिर्याने घेतले. त्यांच्यासह अपर अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक अधीक्षक ऋषिकेश रेड्डी व एलसीबी पी. आय. दतात्रय शिंदे या सर्व बड्या अधिकार्यांचे टीमवर्क सध्या चांगले जमले आहे. या पार्श्वभुमीवर सदरचे प्रकरण सुतावरून स्वर्ग गाठण्या इतपत कठीण असताना या प्रकरणाचे धागेदोरे जोडण्यात त्यांना यश आले. शेवटी पोलिसदलाच्या प्रतिष्ठेचा व विश्वासाचा प्रश्न होता. गेला महिनाभर हा विषय गाजत होता. पंजाब मधील पटियाला येथील डीएसपी कन्येचे वडील असणारे व्यापारी कश्मीर सिंग बाजवा यांनी ४ जानेवारीला धुळ्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांचा ट्रक पटियाला येथून पुण्यास एअर कंडिशनर घेवून जात होता. नव्या नियमानुसार मालाची वाहतूक करताना सोबत त्या फर्मचे जीएसटी इ वे बिल असणे आवश्यक असते. अन्यथा मोठा दंड आकारला जातो. या तरतुदीचा लाभ घेवून ही तोतया जीएसटी पथक वाली मंडळी तोडी पानी करीत होती. कश्मिरसिंग यांच्या ई वे बिलात त्यांनी याच प्रकारे फर्म च्या नावात चुक दाखवून १२ लाख ९६ हजार रुपये दंडाची मागणी केली. तडजोडी अंती १ लाख ३० हजार रुपये गुगल पे द्वारा स्वीकारले. गंमत म्हणजे गोपनीयते साठी सारे बोलणे व्हाटस् अॅप द्वारा केले व रक्कम नाशिकच्या बहिणीच्या अकाउंटवर मागविली. केवळ एवढ्या एका धाग्यावरून धुळे पोलिसांनी एका मोठ्या रॅकेट चा भांडाफोड केला. यात वापरण्यात आलेली टाटा सुमो ही गाडी पोलिस दलाची होती. यात तपासा अंती आता निजामपूर येथे तैनात ए. एस. आय . बिपीन पाटील, मोहाडी पो. ठाण्याचा कर्मचारी इम्रान शेख आणि बिपिनची नाशिकची बॅन्क कर्मचारी बहीण स्वाती पाटीलला ताब्यात घेण्यात आले. या टोळीने पोलिस वाहन वापरून आता पर्यंत अनेकांना गंडा घातला आहे. त्यात आतापर्यंत एकू ण ७१ लाख, ३३ हजार, ९८४ रुपये एवढ्या रकमेचा शोध लागला आहे. पोलिस अधीक्षकांनी अजून कुणाची या टोळीने फसवणूक केली असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ही रक्कम एक कोटीच्या वर जावू जावू शकते. या प्रकरणाने काही प्रश्न निर्माण केले आहेत. पोलिस दलाचे वाहन या प्रकारे कुणीही केव्हाही नेवू शकत नाही. वाहन नेण्याची रिक्विझिशन द्यावी लागते. कुठल्या कारणासाठी कुणाच्या आदेशाने हे वाहन ने.ले जात आहे याची नोंद असते. वाहन किती वाजता गेले परत आले. कुठे फिरले? याची नोंद गाडीच्या लॉग बुकात असते. वरीष्ठ वेळोवेळी हे लॉग बुक तपासत असतात. हे वाहन एखाद्या वेळी गेले, ती बाब वरीष्ठांना कळली नाही. हा अपवाद आपण समजु शकतो. परंतु या प्रकरणात हे वाहन वारंवार वापरण्यात आलेले आहे. यावरून कुणा मोठ्या आणि बड्या अधिकाऱ्याच्या सहमतीने ते तोडी पानीच्या मोहिमेवर जात होते. ही बाब स्पष्ट होते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, एवढे मोठे रॅकेट चालविण्याचे काम व हिम्मत छोटासा ए एस आय दर्जाचा अधिकारी करणार नाही, ही बाब सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे. आता हा बडा अधिकारी कोण? हे शोधून समोर आणणे, हे काम करावे लागणार आहे. पोलिस दलाच्या पदाचा व यंत्रणेचा या प्रकारे सर्रास गैरवापर जर व्हायला लागला तर पोलिस यंत्रणेवर जनता विश्वास ठेवणार नाही. पोलिस यंत्रणेचा दराराच यामुळे धोक्यात येईल. कुंपणानेच शेत खाल्ले अशी ही स्थिती आहे. पोलिस दलात कमाईची अनेक साधने आहेत, परंतु हा जो प्रकार उघडकीस आला आहे तो ओव्हर कॉन्फिडन्सचा प्रकार आहे. वास्तविक या टोळीतील मंडळींनी हा विचार करावयास हवा होता, की आज जो बडा अधिकारी आपल्या सपोर्ट मध्ये आहे किंवा मास्टर माइंड आहे, तो कायमस्वरूपी या पदावर नसेल. अधिकारी बदलत असतात तशी परिस्थिती बदलत असते. याशिवाय इतरही घटकांची परिस्थिती केव्हाही बदलू शकते. आज सपोर्ट मध्ये असणाऱ्या या बड्या अधिकाऱ्याच्या वरच्या अधिकारी देखील बदलू शकतो. ज्यांच्याकडून तोड़ी केली त्यांचे वरपर्यंत काही संबंध निघू शकतात. त्यातून आपण अडकलो तर सुटणे मुश्किल होईल. ही बाब अति लालसे पोटी त्यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही. हे प्रकरण उघडकीस आले आहे त्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. त्यातून खुद्द पोलिसदला मध्ये साफसफाई होईल. परंतु पोलीस दलावरील जनतेच्या विश्वासात देखील वाढ होईल !
(- *योगेंद्र जुनागडे,* धुळे )
0 Comments