*धुळे, दिनांक 16 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा) :* शिरपूर तालुका पोलीस स्टेशन, सांगवी येथील कार्यालयीन विस्तारीकरण, बीट रूम, अधिकारी कक्ष व बहुउद्देशीय हॉल या नव्या सुविधांचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या सोहळ्यास माजी शालेय शिक्षण, क्रीडामंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, शिरपूरचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, तहसीलदार महेंद्र माळी, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, जिपचे माजी अध्यक्ष तुषार रंधे, माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, बबनराव चौधरी, नारायण भाऊसाहेब पाटील, शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, धुळे जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवरांसह सांगवी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार रावल याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहतीसाठी प्रयत्न करून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तालुका पोलीस स्टेशनने स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने उभारलेला विकास कामांचा हा उपक्रम जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
आमदार अमरीशभाई पटेल यांनी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. मागील दहा वर्षात याठिकाणी अनेक अधिकारी येऊन गेले मात्र कामाचा मोठा व्याप, कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असताना देखील आपण त्यापलीकडे जाऊन सामाजिक भावनेतून व्यापक विचार केला आणि सुंदर अशी वास्तू याठिकाणी निर्माण केल्याचे गौरवोद्गार काढले.
प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक हिरे म्हणाले की, शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या विस्तारीकरणासाठी जागेची गरज होती, सांगवी ग्रामपंचायतीने आपणास अधिकृतरित्या जागा उपलब्ध करून दिल्याने जागेची अडचण दूर झाली. याठिकाणी कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था व इतर सेवा सुविधांसह नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उभारण्याचे मोठे आव्हान होते, मात्र पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अमरीशभाई पटेल, तसेच टेक्स्टाईल ग्रुप, ग्रामपंचायत सांगवी, धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.धिवरे यांचे अनमोल मार्गदर्शन आणि सहकार्य आणि अनेक नागरिकांच्या सहभाग, कर्मचाऱ्यांची साथ इत्यादीच्या बळावर हे कार्य करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी परंपरेनुसार मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते बीट रूम, अधिकारी कक्ष व बहुउद्देशीय हॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस स्टेशनला मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा तसेच शिरपूर टोल नाक्यावरील विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत निकवाडे यांनी तर आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी केले.
0000000
0 Comments