धुळे : साक्री रोडवरील यशवंतनगरच्या पाठीमागे शहर पोलिसांची बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी चार संशयितांवर गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शहरासह जिल्ह्यातील अवैध धंदे व बनावट दारू कारखान्यावर प्रभावी कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई झाली.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे व शोधपथकाला शहरातील साक्री रोडवरील यशवंतनगर परिसरात राजीव गांधीनगरात नाल्या किनारी सार्वजनिक प्रसाधनगृहाजवळ धनराज शिरसाट (रा. भीमनगर, साक्री रोड, धुळे) हा साथीदार ऋतिक मोरे, सोनू पवार, आकाश आहिरे यांच्या मदतीने बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी (ता. १) दुपारी साडेतीनच्या सुमारास पथकाने छापा टाकला.
तेथे ऋतिक, सोनू पवार, आकाश आहिरे एका पत्र्याच्या खोलीच्या मागील दरवाजाने पळून गेले. घटनास्थळी मद्याच्या भरलेल्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बाटलीचे बूच, मद्य बनविण्यासाठी लागणारे रसायन, स्पिरिट, दोन दुचाकी व इतर साहित्य, असा एकूण दोन लाख ९३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संशयित धनराज शिरसाट, ऋतिक मोरे, सोनू पवार, आकाश आहिरे यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक बारकुंड यांच्या आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे व पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आंनद कोकरे, दादासाहेब पाटील, डी. बी. उजे, मच्छिंद्र पाटील, कुंदन पटाईत, प्रल्हाद वाघ, नीलेश पोतदार, प्रवीण पाटील, महेश मोरे, तुषार मोरे, मनीष सोनगिरे, गुणवंतराव पाटील, अविनाश कराड, शाकीर शेख, किरण भदाणे, शाहीद शेख आदींनी केली.
0 Comments