*आळंदीहून संत ज्ञानेश्वर यांच्या आणि देहु येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी संप्रदायातील लाखो भक्तगण वारी घेवून पंढरपूरात जातात. आठशे वर्षांची परंपरा असलेली ‘वारी’ आणि अठ्ठावीस युगे कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या या भेटीत खंड पडला. बा पांडूरंगा आम्ही चुकलो आहोत, आम्हाला सर्वांना माफ कर !*
पृथ्वीतलावरील सर्व सणांच्या अलौकिक सौंदर्यात आणखीन भर पडते ती म्हणजे पंढरीच्या वारीने. डोळ्यांचे पारणे फिटावे अशा नयनरम्य पंढरीची वारी म्हणजे विठ्ठलनामाच्या अमृत कलशातून प्रेमाचा वर्षाव व्हावा आणि त्यातील एक लहान तृषार जिभेवर पडावा, विठ्ठल नामाचा जयघोष कानावर पडावा आणि मृदूंगाच्या निनादात देह बेभान व्हावा अशी ही वारी. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या वारीचा सोहळा म्हणजे डोळे दिपवून टाकणारा नयनरम्य सोहळा असतो. पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा पंढरपूर तिर्थक्षेत्राचा उल्लेख केला जातो. म्हणून ‘आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ वारी’ असा उल्लेख संत नामदेवाच्या अभंगात सापडतो. पंढरपूर आणि काशी विश्वेश्वर ही दोनच अशी तिर्थक्षेत्रे आहेत जी कधीही नाश पावणारी नाहीत. त्यामुळे आषाढी एकादशीला अनन्य साधारण असे महत्व आहे. कार्तिकी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समिष्टी या साधनेचा अनुभव एकमेकांना देण्यासाठी या दिवसाला महत्व आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध गावांमधून कानाकोपर्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत वारकरींच्या रूपात पंढरपूर येथे पाहोचतो. चंद्रभागेचे स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन ही एकच इच्छा या पांडूरंग भक्तांच्या मनी असते. शेतकरी आपल्या शेतीत पेरणी करतात आणि मग वारीसाठी प्रस्थान करतात. ते घरी जाईपर्यंत शेतातील पिकांची जोमाने वाढ झालेली असते. वारीची परंपरा ही संतांनी जतन करून ठेवलेली प्राचिन परंपरा समजली जाते. आकाशात ढग, सर्वत्र पावसाचे वातावरण, बैलांच्या गळ्यातील घंटानाद आणि शेतात चालणारी तिफण अशा वातावरणात टाळ मृदूंगांचा नाद पृथ्वीवर स्वर्गाचा आभास निर्माण करतो. परंतू अशा या सुंदर विठ्ठल नामाच्या जयघोषालाही एका विषाणूची ‘नजर’ लागावी आणि ब्रम्हांडात निनादावा असा विठ्ठल नामाचा जयघोष ही शांत व्हावा, बा विठ्ठला काही चुकलो का रे आम्ही ? तुझ्या नामाच्या जयघोषाने प्रचंड अशा शक्तिचा स्त्रोत आमच्या शरीरात निर्माण होतो. तुझ्या सेवेची भक्तीधारा आमच्या मुखातून प्रवाहित होते. आमच्या पायांमध्ये तुझ्या नामाची शक्ती निर्माण होवून ते तुझ्या नगरीत येण्यासाठी नाचत येतात. हातातल्या चिपळ्या आणि गळ्यातील मृदूंग तुझ्या नामाचा गजर आमच्या मुखातून होण्याआधी तुझे नाम घेतात. अश्व रिंगण, मेंढ्यांची रिंगणे, सुर्य-चंद्राच्या प्रकाशाने अलौकिक होतात. या प्राण्यांनाही तुझ्या भेटीची आस असतांना असा द्वारबंद करून का रूसलाय बा विठ्ठला ? अरे आम्ही तर ‘पामर’, तुझ्या कलांना समजलो नाही अजूनही, कारण आम्हाला तु अजूनही पूर्ण कळाला नाही रे. आम्हाला माफ कर. आणि सद्बुध्दी दे बा विठ्ठला ! काढ तुझ्या कमरेवरचे हाथ आणि धर आमचे कान, कारण आम्ही विकासाच्या महामार्गावर निघालो आहेात. हजारो वृक्षांची कत्तल करत, आम्ही नद्या-नाले सर्व पोखरून टाकतो आहोत, त्या वाळुसाठी कारण आम्हाला घरे बांधायची आहेत. हजारो गायी दररोज मारून आम्ही खातो आहोत कारण आम्हाला गाईच्या दुधापेक्षा गायीच्या मांस भक्षणातच आनंद आहे. आम्हाला एक-दुसर्याचा द्वेष करण्यात आनंद आहे. आम्हीच आमच्या माता-भगिनींना छळतो आहोत, मारतो आहोत. त्यांचेवर अत्याचार करतो आहोत. शक्य झाले तर त्यांची विक्रीही करीत आहोत. आईची हत्या करून आईचे काळीज खाणारे नराधम सुध्दा आम्हीच. या देशाचा पोशिंदा राजधानीच्या सीेमेवर रुसून बसला आहे. परंतू त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आणि वेळ असला तरी आम्ही त्याला भेटायला जाणार नाही. आम्हाला हवी आहे केवळ सत्ता, आम्हाला हवी आहे अवैध मार्गाने संपत्ती. आमचा एक दुसर्यांवर विश्वास नसला तरी आम्ही सत्तेसाठी एकत्र आलेलो आहोत. गळ्यात गळा घातला असला तरी आमच्या हातात ‘सुरा’ आहे. आम्ही एक दुसर्याचा विश्वासघात करतो आहोत. फसवणूक करतो आहोत जनतेची. कारण आमची बुध्दीच आता स्वार्थाच्या अंधार कोठडीत जावून बसली आहे. म्हणून बा पांडूरंगा आम्हाला सद्बुध्दी दे. जनसेवेची, निसर्गप्रेमाची, जनकल्याणाची, मानवी प्रेमाची आणि निस्वार्थ जनसेवेची. तु कमरेवर हाथ ठेवून असा उभा राहू नको. जीवघेण्या विषाणूला सुध्दा हद्दपार कर आणि तुझ्या या पामरांना सुखी कर. शेतकर्यांना भरभरून पीकू दे आणि या आषाढीला नसली तरी पुढच्या आषाढीला तुझी पंढरी दुमदुमू दे ! जय हरी विठ्ठलाचा जयघोष आसमंतात गरजू दे. एवढेच !
*दैनिक पोलीस शोध*साभार


0 Comments