Header Ads Widget

धनगरांना मिळणारे लाभ मेंढपाळ ठेलारींनाही मिळावे विठ्ठलभाऊ मारनर यांच्या नेतृत्वाखाली नाना पटोलेंना साकडे



साक्री- धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यात असलेली ठेलारी ही जमात पूर्णवेळ मेंढपाळ व्यवसाय करीत आपला उदरनिर्वाह करीत दर्‍याखोर्‍यात राहुन भटकंती करणारा व विकासापासून तसेच शैक्षणिक, सामाजिक आर्थिक विकासापासून वंचित राहिला आहे. सदर शाखा धनगरांचीच पोट जात असून धनगर व ठेलारी यांचा डीएनए पण एकच आहे म्हणून ठेलारी शाखेला 27(ब) मधून 29(क) मध्ये समाविष्ट करून धनगरांना मिळणारे लाभ ठेलारी शाखेला पण मिळवून द्यावेत अशा आशयाची मागणी उत्तर महाराष्ट्र मेंढपाळ ठेलारी (धनगर) समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ मारनर यांनी निवेदनाद्वारे शिष्टमंडळामार्फत  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांना टिळक भवन, दादर येथे भेट घेऊन दिले असून त्याच दिवशी नाना पटोले यांनी तातडीने अध्यक्ष मागासवर्गीय आयोग महाराष्ट्र राज्य पुणे यांना पत्र देऊन सदर प्रस्ताव संबंधित मंत्रालयीन विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा अशी शिफारस केली व ठेलारी समाजावरील अन्याय आघाडी सरकार मार्फत दूर करील असे आश्‍वासन दिले. साक्री तालुक्याचे भूमीपुत्र शेवाळी येथील रहिवाशी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनवणे यांनी या शिष्टमंडळाची भेट घडवून आणली होती.
उत्तर महाराष्ट्र मेंढपाळ ठेलारी (धनगर) समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ मारनर यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सन 1971 साली महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून विमुक्त जाती भटक्या जमातीला आरक्षण देण्यात आले. त्यात काही जाती आणि जमातीचा समावेश करण्यात आला. त्याचप्रमाणे सन 1977 ला उत्तर महाराष्ट्रातील मेंढपाळ ठेलारी जमातीचा पण विमुक्त जमाती 27(ब) नंबर समावेश करण्यात आला होता. तद्नंतर सन 1990-91 ला परत काही जाती आणि जमातीचा समावेश करण्यात आला. शासनाच्या उचित ध्येय-धोरणानुसार  काही जमाती व जाती अतिमागास असल्याकारणाने अ,ब, क, ड अशी वर्गवारी करून मेंढपाळ, धनगर समाज दर्‍याडोंगरात राहणारा भटकंती करणारा आणि विकासापासुन मागासलेला आहे. असे शासनाच्या निदर्शनास आल्याने धनगर समाजाला 29(क) वर्गवारी देवुन इतर जाती जमातीच्या प्रमाणे धनगरांचा पण विकास व्हावा म्हणून 29(क) ही वर्गवारी देवून 3.5 टक्के आरक्षण देण्यात आले. पण धनगरांचीच पोटशाखा असलेली उत्तर महाराष्ट्रातील धनगरांच्या 28 पोट शाखांपैकी ठेलारी 27(ब) ही शाखा पूर्ण वेळ मेंढपाळ व्यवसाय करीत आहे. म्हणून आमची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की, ठेलारी शाखेला 27(ब) मधुन 29(क) मध्ये वर्ग करण्यात यावे त्याकामी आमचा प्रस्ताव मा. मागासवर्गीय आयोग पुणे यांच्या दालनात अंतिम टप्प्यात म्हणजे संपूर्ण पुराव्यानिशी सादर केलेला असुन अनेक वेळा हेअरींग (तपासणी अहवाल) सादर झालेला आहे. तरी महाशय सदर अहवाल मा. मागासवर्गीय आयोगाकडून तात्काळ मागुन घ्यावा व सदर ठेलारी ( शाखेला) 29(क) मध्ये समाविष्ट करून सदर धनगरांना मिळणारे लाभ ठेलारी शाखेला पण मिळवून द्यावेत अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांना निवेदन देण्याच्यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनवणे हेही उपस्थित होते. शिष्टमंडळात विठ्ठलभाऊ मारनर यांचेसोबत अ‍ॅड. संदीपान नरोटे (औरंगाबाद), रमेशभाऊ सरक(साक्री), वामनराव मारनर (साक्री), सतीष सरक (साक्री), डॉ. विक्रम कोळेकर (सांगली), लखनभाऊ मदने (लातुर), दादाराव सावळे (औरंगाबाद) यांचा समावेश होता.
.

Post a Comment

0 Comments