Header Ads Widget

बाभुळ झाड उभेच आहे! आमचे सन्मित्र, ‘तोफ’ चे संपादक भाऊसाहेब अरुण रामदास पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती बद्दल दोन शब्द



कविवर्य साथी वसंत बापट यांच्या कवितेतील शब्दात सांगायचे तर
‘अस्सल लाकूड भक्कम गाठ,
ताठर कणा, टणक पाठ,
वारा खात, गारा खात
बाभुळ झाड, उभेच आहे.’
बाभुळ झाड उभेच आहे!

आमचे सन्मित्र, ‘तोफ’ चे संपादक भाऊसाहेब अरुण रामदास पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या सरचिटणीस व नंदूरबार जिल्हा समन्वयक म्हणून प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे यांनी नुकतीच नियुक्ती केली. भाऊसाहेबांच्या नियुक्तीचे अवघ्या खान्देशात स्वागत होत आहे. भाऊसाहेब म्हणजे एकनिष्ठेचे अत्युत्तम उदाहरण म्हणावे लागेल. सध्या काँग्रेस पक्ष हा कठीण अवस्थेतून मार्गक्रमण करीत आहे. काँग्रेसने देशभरात ज्यांना मोठे केले, अनेक वर्षे सत्तेच्या तुपात बोटे चाटली, ती अनेक उच्चपदस्थ मंडळी उगवतीच्या दिशेला नमस्कार करीत बाहेर पडली. परंतु त्यांची निष्ठा सुतरामही ढळली नाही. शारिरीक व्याधी असूनही सडगाव ते धडगाव असा खान्देश पिंजून काढला आणि एकेका दिवसात काँग्रेस सेवादलाच्या 15 शाखा सुरु करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. त्यांच्या नियुक्तीनंतर खान्देशातील सर्व धर्मजाती जमातीच्या नेते कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी अभिनंदन सत्कार शुभेच्छा देण्यासाठी आलेली गर्दी हीच खरी भाऊसाहेबांची श्रीमंती होय. देशावर एकेकाळी एकछत्री अंमल असलेल्या काँग्रेस पक्षाच्या धुरीणांनी भाऊसाहेबांची नियुक्ती करून निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी योग्य तो संदेश पाठविला आहे. आणि भाऊसाहेबांसाठी ही संधी आहे आणि ते नक्कीच संधीचे सोने करतील. कारण बर्‍याच संघटनांमध्ये आपण पहातो अनेक कार्यकर्ते राबराब राबतात आणि संघटनेला सुगीचे दिवस आले की संघटना उभारणीसाठी मेहनत करणारे कार्यकर्ते मातीमोल होतात (मेहनत करे मुर्गा और अंडा खाये सुभान) अशी अवस्था आपण पहातो. संघटनेशी किंवा संघटनेच्या विचारांशी दुरान्वेही संबंध नसलेली माणसे सत्तास्थान बळकावतात. कानामागून येतात आणि तिखट होतात. घाम गाळून संघटना उभी करणार्‍या भाऊसाहेबांच्या हातात आता संघटनेची धुरा आली आहे. ते नक्कीच निष्ठेने काम करणार्‍या कार्यकर्त्यांना न्याय देत संघटनेला ऊर्जा मिळवून देतील याविषयी शंका नाही. भाऊसाहेब अरुण पाटील हे सत्तरीच्या उंबरठ्यावर असले, शारीरिक व्याधींनी जायबंदी असले तरी त्यांचा जोम, उत्साह, संघर्ष करण्याची जिद्द वाखाणण्याजोगी असून उदयोन्मुख काँग्रेस सेवादल कार्यकर्त्यांसाठी ती नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
राजकारणाचा प्रांत हा बदमाशांचे शेवटचे आश्रयस्थान असं म्हणतात. त्यात भाऊसाहेब अपवाद आहेत. त्यांनी राजकारणात वावरतांना कधीही सभ्यता सोडली नाही. ‘कोल्ली मोल्ली टेक नि मन्हा धोतरकडे देख’’ अशा काही पुढार्‍यांच्या गर्दीत भाऊसाहेबांचे सेवाव्रती कर्तृत्व उठून दिसते. त्यांचे वक्तृत्व पहाडी असून त्याला विनोदाची झालर असते. अहिराणी भाषेत ते विनोदाची पेरणी करून श्रोत्यांवर पकड मिळवतात. त्यावेळी ते कोणावर ‘तोफ’ डागतील याविषयी श्रोत्यांमध्ये उत्सुकता असते. केवळ या निसर्गदत्त देणगीमुळेच ते अनेक सभा जिंकतात. एक काळा असा होता की, भाऊसाहेब बोले आणि संघटना हाले. परंतु संघटनेत राहून त्यांनी कधीही गैरफायदा घेतला नाही किंवा अवैध संपत्तीचे धनी झाले नाही. अनेक वर्ष सत्ताधारी पक्षात राहुनही स्वत:ची संस्थाने उभी केली नाहीत. अथवा एखाद्या शासकीय कमेटी, रेशन,दारु, पेट्रोल यांचा परवाना मागितला नाही. न मागता मिळणार होता, तो नाकारला. अथवा उच्च पदावरही बढती मिळावी म्हणून कधी पक्षनेत्यांच्या दरबारी मुंबई, दिल्ली वारी केली नाही. भाऊसाहेबांना सध्या मिळालेले पद हे स्वत:हून दारी चालून आलेले आहे. त्यांनी ते पद मिळवले नसून सन्मानाने मिळाले आहे. निवृत्तीच्या वयात त्यांना हे पद मिळाले असले तरी घरी बसूनही ते संघटनेची सूत्रे हलवू शकतात. अर्थात स्वस्थ बसून रहाणे त्यांच्या प्रवृत्तीला परवडणारेही नाही. त्यांनी जे पेरले त्यातून काँग्रेस सेवा दलात, खान्देशात सर्वदूर त्यांनी फौज उभी केली आहे. त्यांच्या आवाहनाला ‘ओ’ देणार्‍या कार्यकर्त्यांची कमी नाही. कार्यकर्त्यांना फक्त भाऊसाहेबांच्या तोंडून शब्द हवा आहे. ‘लढ म्हणा!’ या वयात शारीरिक व्याधी तरीही भाऊसाहेबांमध्ये लढण्याची ऊर्जा, उमेद, जिद्द कायम आहे. पत्रकारितेतही ते आपला दबदबा आजही कायम राखुन आहेत. सद्यस्थितीत जातीयवादी धर्मांधशक्ती आपले पाय घट्ट रोवत असतांना ‘आंदोलक’ भाऊसाहेबांची निवड योग्यच आहे. या निवडीचे स्वागत झालेच पाहिजे.

- गो. पि. लांडगे,
ज्येष्ठ पत्रकार (मो. 9422795910)

Post a Comment

0 Comments