सोनगीर : बनावट दस्तऐवज सादर करून शिक्षक
पदाचा तब्बल बारा वर्षे पगार काढून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी विश्वनाथ ता. धुळे येथील मुख्याध्यापक व संस्थाचालकास अटक करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवार दि.६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे
आदेश न्यायालयाने दिले आहेत. विश्वनाथ येथील द्वारकामाई सर्वांगीण विकास संस्था संचलित जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात अरूण श्रीराम
देवरे रा. बिलाडी ता. धुळे, हे शिक्षक कार्यरत होते. मात्र बारा वर्षापुर्वी संस्थाचालक सुभाष पाटील यांनी शिक्षक देवरेंना कमी करून त्याजागी त्यांची मुलगी चेतना पाटील हिस नियुक्ती आदेश दिले. माध्यमिक शिक्षणाधिकारींचे बनावट आदेश व मान्यता मिळवून तसेच बनावट दस्तऐवज सादर करून चेतना पाटील हिचा सुमारे १२
वर्षाचा पगारही काढून घेतला. दरम्यान शिक्षक देवरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
झाला. त्यानुसार बारा महिने चौकशी करीत व पुरावे गोळा करीत शिक्षक देवरे यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने संशयित संस्थाचालक सुभाष पाटील (६४), मुख्याध्यापक कैलास सुर्यवंशी (५१) यांना अटक करण्यात आली.
संशयित शिक्षिका चेतना पाटील फरारी आहे. पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी व वेतनपथक अधीक्षक यांचा गुन्ह्यात सहभाग आहे का? याबाबत चौकशी सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी. ई.
निकाळजे तपास करीत आहेत.
0 Comments