*धुळे* जिल्ह्यातील चिमठाणे येथे तरुण पशुवैद्यकाचा राज्यमार्गावर भर दुपारी चाकूचे सपासप वार करून खून करण्यात आला. रस्ता लुटीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला. डॉक्टरची नवी मोटारसायकल व मोबाईल लुटण्यासाठी भररस्त्यात दिवसा खूनापर्यंतचे कृत्य करण्याची मजल आरोपींची झाली. ही यातली सर्वात मोठी गंभीर बाब आहे. त्यामुळेच संतप्त जमावाला शांत करताना जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित हे देखील भावूक झाले, गंभीर झाले.
त्यांनी घोषित केले, की " आरोपी नरकात गेले तरी त्यांना तेथून शोधुन काढून अटक करू, तसे झाले नाही तर नोकरीचा राजीनामा देवू ! " पोलिस खात्यात खरे तर अशा उच्च संवेदनशीलतेची अपेक्षा आजकाल कुणी करत नाहित. वास्तविक जनतेच्या जीवनमरणच्या विषयाशी संबंधित हे खाते आहे. या खात्याकडूनच संवेदनशीलतेची समाजास खूप अपेक्षा असते. पण वाझे , प्रदीप शर्मा , परमवीर सिंग वगैरे मुंबई क्राईम ब्रॅन्च वाल्यांचे एक एक अमानवीय उद्योग पाहिले, की एकूणच पोलीस दलाच्या प्रतिमेविषयी निराशाजनक चित्र उभे राहते. त्या पार्श्वभुमीवर चिन्मय पंडित सारख्या अधिकाऱ्यांमधील संवेदनशीलता पाहता, सर्वच काही संपलेले नाही, असे वाटते व सकारात्मक चित्र निर्माण होते. दिलेल्या शब्दाप्रमाणे पोलिसांनी चोवीस तासाच्या आत तिनही मारेकरी जेरबंद केले. या गंभीर प्रकरणानंतर यंत्रणा पूर्णतः कामास लागली व कारवाई झाली. कारवाई झाली ही चांगली बाब आहे. परंतु ही वेळ कां आली ? ही टोळी इतकी बेछुट कां झाली होती? या आरोपींना कायद्याचा, पोलिसिंगचा धाक कां उरलेला नव्हता? या प्रश्नांची झाडाझडती आता जिल्हा पोलिस प्रमुखांनी घेणे आवश्यक झाले आहे. गेले काही महिने गुजरातमधुन गुन्हेगारी करून या भागात पळून आलेल्या आरोपींचे वास्तव्य परिसरात सर्वत्र चर्चेत होते. चिमठाणे ते रोहाणे फाटा डांगुर्णे पर्यंतचा राज्य मार्गाचा हा पट्टा गेल्या अनेक महिन्यांपासून असुरक्षित बनला आहे. रात्री बेरात्री सोबतच दिवसाढवळ्याही वाटसरू , वाहनधारकांना लुटण्याच्या कितीतरी घटना या पट्टयात घडल्या आहेत. मुळात पोलिसात तक्रार नोंदविली जाणे हे एक मोठे दिव्य असते व नोंदविली तरी उपयोग नाही म्हणून नव्वद टक्के लोक अशा तक्रारी नोंदवतच नाहीत. परंतु एकाच भागात वारंवार अशा घटना घडत असताना , त्यामागे कोणते आरोपी आहेत, ही माहिती तर खबरे व काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संबंधित पोलिस यंत्रणेपर्यंत पोहोचतच असते. गेल्या काही महिन्यांपासून तर या आरोपींचा परिसरात अक्षरशः उच्छादच सुरू होता. या रस्त्यावर एक पोलिस चेकपोस्टही आहे . त्याचा नेमका उपयोग काय ?त्याचा लाभ कुणाला होतो ? काही कार्यकर्त्यांनी वेळोवेळी या अशा आरोपींच्या बाबत पोलिसांना बोललेही होते. पण त्यांचा इंटरेस्ट वेगळाच असतो. महामार्गावरील आपल्या हद्दीतील ढाबे व हॉटेल्स मधील अवैध बनावट दारु अंमली पदार्थ विक्रीचे हप्ते गोळा करणे. पोळा, कर, गटारी निमित्त दारुचा खप वाढतो. त्यासाठी अतिरिक्त वसूली करणे. चिमठाणे लगत शेवाडे रस्त्यावर जुगाराचा मोठा अड्डा आहे . मोठमोठ्या गाड्या तेथे लागतात. थेट खेतिया म . प्र . , गुजरात मधून पट्टीचे जुगारी तेथे येतात. दिवसाला दहा हजारास हजार रुपये दराने जुगाऱ्यांना व्याजाने पैसे देणारे फायनान्सरही तेथे लाखोंची कॅश धरून सेवेत बसलेले असतात. रस्ता लुट करणारे , गुजरातमधुन गुन्हेगारी करून पळून आलेले गुन्हेगार यांच्यावर वॉच ठेवून वचक ठेवण्यापेक्षा अशा जुगार अड्डयास वेळ देणे अधिक लाभकारी असते. विशेषतः पोळा , कर व विशिष्ठ सणांना अशा ठिकाणी जास्त गर्दी होते. त्यामुळे जनतेच्या सुरक्षेपेक्षा अशा स्पॉट कडे जास्त वेळ देणे बोनस लाभकारी असते. या सर्व बाबी चिमठाणे , दराणे , रोहाणे ,खलाणे , डांगुर्णे परिसरात आधिच सार्वत्रिक चर्चेत होत्या. ज्या आरोपींनी भररस्त्यात भरदिवसा एकढे मोठे कृत्य केले त्यांची इतकी हिंमत वाढण्याइतपत स्थिती कां निर्माण झाली ? त्यास कोण जबाबदार आहे ? याचे स्वतंत्र विश्लेषण वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी करून त्यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
(दै. पथदर्शी साभार
0 Comments