*धुळे,* नाशिक जिल्ह्यात टोल माफियांचा धुमाकुळ थांबता थांबत नाही. हे टोल प्लाझा सतत कोट्यवधी रुपये लुटमारीचे केंद्र बनले आहेत. येथील ठेकेदार आणि राजमार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांचे संगनमत प्रचंड आहे. टोल ठेकेदार कंपनी, मॅन पॉवर पुरविणारा ठेकेदार यांनी टोल चा झोल करून जी लुटमार चालविलेली असते, ती राजमार्ग प्राधिकरणचे स्थानिक प्रकल्प अधिकारी व वेळोवेळी तपासणी , देखरेख करणारे त्यांचेही वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताशिवाय हे सर्व प्रकारचे विविध कोट्यवधिचे झोल चालूच शकत नाही. वरपर्यंत ही साखळी इतकी मजबूत आहे, की नागरिक, सामाजिक कार्यकर्ते , व्हीसल ब्लोअर व खुद्द महसूल किंवा अन्य खात्यांच्या अधिकाऱ्यांनी कितीही अहवाल पाठविले तरी त्यांचे काहीच वाकडे होत नाही. सर्वात प्रथम सर्वसामान्य माणसांनी हा समज काढून टाकला पाहिजे, की 'ते टोलचा झोल करो की आणखी काही करो , आपल्याला काय ? आपल्या खिशातून थोडेच जात आहेत. ' पण तसे नाही. आपल्याच खिशातून ही टोलच्या झोलची रक्कम जाणार आहे. सदर टोल प्रामाणिकपणे नियमाने चालविला तर ज्या कालावधी नंतर हा टोल संपणार आहे, त्यापेक्षा वाढीव दोन चार वर्ष अधिक काळ हा टोल तेथील गडबड घोटाळ्यामुळे राहणार आहे. म्हणजे अधिक कालावधीचा भुर्दंड हा नागरिकांवरच पडणार आहे. वसूलीची मुदत संपल्यावरही ही मुदत वाढवून दिल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. विविध टोल नाक्यांवर फास्ट टॅगच्या आधी विनापावती पैसे घेवून वाहने सोडण्याचे रॅकेट कार्यरत होते. काही ठिकाणी टोलला बायपास करणारे रॅकेट होते. विविध प्रकारे येथे भ्रष्ट्राचार चालतो. पूर्वी महसूलमध्ये गौण खनिजची बनावट चलने चालावयाची. ट्रॅफिक हवालदारांकडे दंडाची दोन पावती पुस्तके असावयाची . एक कार्यालयाचे ओरिजिनल तर दुसरे सेम टू सेम पण बनावट. एका वाहन धारकास दंडाची ओरिजिनल पावती दिली, की दोन वाहन धारकांना दंडाच्या बनावट पावती पुस्तकातून पावत्या दिल्या जायच्या. त्या काळात तब्बल ३३ हजार कोटी म्हणजे आजचे एक लाख कोटीचे बनावट स्टॅम्प प्रकरण तर सर्वांनाच ठाउक आहे. पेट्रोल पंपातही शॉर्ट डिलेव्हरीसाठी सॉफ्टवेअरमध्ये गडबडी केली जाते. फास्ट टॅगच्या आधी पूर्ण टोल कॅश सिस्टिम होती, तेव्हाही व आता फास्ट टॅग आल्यानंतरही एक दोन कॅशच्या लाईनी असतात. वाहन चालकाने टोलची रक्कम दिली म्हणजे त्यास एक कॉम्पुटराईज्ड प्रिंटरची पावती दिली जाते. फॅक्स पेपर प्रमाणेच यावरील प्रिंटेड अक्षरांचे लाईफ काही तासांचेच असते. नंतर आपोआप ही अक्षरे दिसेनाशी होतात. शिवाय एकदा टोल दिला, वाहन निघाले, की ही पावती खरी का खोटी? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात व क्रॉस व्हेरिफिकेशच्या भानगडीत कुणीच पडत नाही. शिवाय कॉम्प्युटराईज्ड सिस्टिम मधुन ही पावती आली असल्याने आपले पैसे योग्य खात्यात जमा होतील, असा त्या वाहनचालकास विश्वास असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले वाहन टोलमधून पास झाले ना ; मग काय घेणे देणे? असा विचार सामान्य माणूस करतो. याच गोष्टीचा लाभ टोल प्लाझा चालविणारे ठेकेदार व त्यांच्या वैयक्तिक हिताचे रक्षणकर्ते राजमार्ग प्राधिकरणचे अधिकारी वर्षानुवर्ष उठवित आहेत. एकूणच देशभराचा विचार केला तर इतक्या वर्षात हा घोटाळा शेकडो कोटींमध्ये जावू शकतो. धुळे नाशिक महामार्गावर अवधान व पिंपळगाव अशा दोन टोल प्लाझा वर टोल भरावा लागतो . यापैकी भानगडींसाठी नेहमीच गाजणाऱ्या पिंपळगाव बसवंत टोल प्लाझावर नुकताच एक मोठा घोटाळा पकडण्यात आला. कॅश लेन मधुन दिल्या जाणाऱ्या कॉम्पुटराईज्ड पावत्या नेहमी एकसारख्या दिल्या गेल्या पाहिजेत. फॉर्मेट फॉन्ट वगैरे गोष्टी सारख्या असल्या पाहिजेत . ही साधी गोष्ट आहे. परंतू या पावत्यात फरक आढळून येवू लागला. म्हणून काही वाहनधारक, कार्यकर्त्यांनी या बऱ्याच पावत्या जमा केल्या. त्यानंतर टोल प्लाझावर ऑपरेशन केले. तेव्हा कॉम्पुटरमध्ये टोल प्लाझासाठी मान्यताप्रात अधिकृत सॉफ्टवेअर ऐवजी स्कायलार्क नावाच्या दुसऱ्याच सॉफ्टवेअरमधून या पावत्या दिल्या जात असल्याचे आढळून आले. म्हणजे टोल प्लाझाच्या अधिकृत अकाउंटमध्ये ते वाहन पास झाल्याची व त्या वाहन चालकाने टोलची रक्कम जमा केल्याची कोणतीच नोंद येत नसे. सर्व काही वरच्या वर खेळ चालत होता. एखाद्या वेळी एखाद्या गुन्ह्यात एखाद्या वाहनास किंवा चालकास कुणी मुद्दाम गोवले. तेव्हा गुन्हा घडल्यावेळी मी किंवा माझे वाहन घटनास्थळी नव्हतेच . तेव्हा मी किंवा हे वाहन अमूक टोल प्लाझावर होते, असा त्याने बचाव केला व जास्त दिवसानंतर त्याचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध झाले नाही तर, निदान टोल भरल्याचा पुरावा सेव्ह डाटा मधुन कुणी मागितला तर तो देखील मिळणे शक्य होणार नाही. कारण मुळ सॉफ्टवेअरमधून त्याची पावती दिली गेलेलीच नसते. सदर वाहन व टोलची रक्कम रेकॉर्डवरच नसते . पिंपळगावला हे बनावट सॉफ्टवेअर उघडकीस आले. याचा अर्थ हे डुप्लीकेट सॉफ्टवेअर खास बनविण्यात आले आहे. देशभरात ते कितीतरी टोल प्लाझांनी विकत घेतले असेल. किती वर्षापासून हे सॉफ्टवेअर चालू असेल . त्याच्या माध्यमातून किती किती, शेकडो कोटींच्या टोलच्या पावत्या वरच्या वर देण्यात आल्या असतील? याचा आपण अंदाज बांधू शकतो. यामुळे त्या त्या प्लाझाची टोल वसूलीची मुदत वाढणार आहे. त्याचा भुर्दंड पुन्हा सामान्य वाहन चालकांवरच पडणार आहे. यास्तव सर्वांनी जागरूक होणे आवश्यक आहे.
(... दै. पथदर्शी साभार

0 Comments