Header Ads Widget

पत्रकारांच्या मोफत एस.टी. प्रवास योजनेत कोलदांडा



धुळे- जिल्ह्यातील अधिस्विकृतीधारक पत्रकारांना एस.टी. कडून मिळणाऱ्या मोफत प्रवास सवलत योजनेत स्मार्ट कार्ड एजन्सीचा कोलदांडा घालण्यात आला आहे.  

मोफत एस.टी. प्रवास योजने अंतर्गत अधिस्विकृतीधारक पत्रकारांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहेत. ते प्रवासाला  निघालेल्या पत्रकारांनी कंडक्टरला दिल्यानंतर स्मार्ट कार्ड रीड न होणे, कालबाह्य झाल्याचे दाखविणे किंवा निहीत प्रवास पूर्ण झाल्याचे दाखविणे असे चुकीचे मेसेज मशिनमध्ये येत असतात. त्यामुळे कंडक्टर  व  पत्रकारांचे बसमध्येच भांडणे होतात. मन:स्ताप होतो आणि प्रवास करणे जिकीरीचे होऊन बसते. विशेष म्हणजे कालच नूतनीकरण केलेले स्मार्ट कार्ड जेव्हा धुळे बसस्थानकावर प्रातिनिधीक स्वरुपात पाच कंडक्टरांशी संपर्क साधून त्यांच्या मशिनमध्ये चेक केले असता ते कालबाह्य दाखवतात. मात्र नूतनीकरण कार्यालयात तेच कार्ड पुढील तारीख 31 मार्च 2022 दाखविते. अशीच परिस्थिती राज्यभरात असण्याची शक्यता आहे.

ही सर्व गाऱ्हाणी घेऊन काल धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे, दिलीप विभांडीक, बापू ठाकूर, दत्ता बागुल आणि नितीन ढगे यांनी विभागीय वाहतुक अधिकारी प्रल्हाद घुले साहेब यांची भेट घेतली. त्यांनी देखील पत्रकारांचे म्हणणे समजून घेत तक्रारीची शहानिशी करून घेतली. संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला बोलावून घेतले आणि लवकरात लवकर या तक्रारीचे निवारण करावे असा तोंडी आदेश संबंधित कंपनीला दिला.

 


Post a Comment

0 Comments