धुळे-राज्यातील अधिस्विकृती धारक पत्रकारांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दरवर्षासाठी आठ हजार किलोमिटर मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली असून त्यासाठी ज्या स्मार्ट कार्ड एजन्सीने कार्ड वाटप केले आहेत त्यात अजब आणि भोंगळ कारभाराचे काही किस्से दृष्टीक्षेपात येत आहेत. त्यात भोंगळ कारभाराचा विशेष नमुना म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील ‘केसरी’ चे प्रतिनिधी उदयकुमार देशपांडे व धुळे येथील ‘जागृती पर्व’ चे संपादक दत्ता बागुल या स्वातंत्र्यकाळात जन्मलेल्या पत्रकारांना त्यांनी स्मार्ट कार्ड द्वारे स्वातंत्र्यसैनिक असल्याचा (अधिकृत!) दर्जा दिला आहे. या दोन्ही पत्रकारांनी प्रामाणिकपणे संबंधित अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आणि आम्ही स्वातंत्र्य सैनिक नाहीत हे लक्षात आणून दिले. तसे शासन व महामंडळाला न फसवता कार्ड परत केले आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिळणाऱ्या सोयी सवलती मानधनासाठी आग्रह धरला नाही एव्हढे बरे झाले. कदाचित ते मिळाले तरी आश्चर्य वाटायला नको. उभय पत्रकारांना आपले कथित स्वातंत्र्य सैनिक असल्याचे कार्ड जमा करून दहा महिने झाले तरीही अद्यापही त्यांना कार्ड बदलून देण्यात आलेले नाही. त्यापैकी एकाला जुन्याच कार्डाप्रमाणे मुदतवाढ देऊन प्रवासाचे अधिकार देण्यात आले आहेत. म्हणजे ‘स्मार्ट कार्ड’ चा अधिकार वर्षभरासाठी आठ हजार किलोमीटर आणि जुन्या कार्डचा अमर्याद प्रवास! यापेक्षा भोंगळ कारभाराचा दूसरा काय नमुना असू शकतो?
काल ज्येष्ठ पत्रकार दिलीप विभांडीक, बापू ठाकूर, नितीन ढगे, दत्ताजी बागुल यांच्यासह वाहकांना दिलेले मशिन व स्मार्ट कार्ड बाबत अनेक बाबी धुळे विभागीय वाहतुक अधिकारी प्रल्हाद घुले साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली. वाहक बांधवांना देण्यात आलेले मशिन अक्षरश: कागदे चिकटवून वापरण्यात येत आहेत. अनेक मशिननी आपले काम थांबविल्याने जुन्या पद्धतीचेच तिकीट पेटीचा वापर सुरु झाल्याचे दिसून येत आहे. हे मशिन हाताळतांना वाहक बंधु-भगिनी अक्षरश: वैतागले आहेत. ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ अशी त्यांची अवस्था आहे. पत्रकारांच्या बाबतीत संबंधित कंपनीने दिलेले स्मार्ट कार्ड आणि वाहकांजवळील मशिन यांचा ताळमेळच बसत नाही. स्मार्ट कार्ड जे दाखवते ते मशिन नाकारते अशी परिस्थिती आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन स्मार्ट कार्ड व संबंधित मशिन यांचा ताळमेळ बसवावा असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांनी केले आहे.
- गो. पि. लांडगे (ज्येष्ठ पत्रकार), धुळे
0 Comments