Header Ads Widget

अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या 44व्या अधिवेशनाची जय्यत तयारी




अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी पत्रकारांनी खारीचा वाटा उचलावा

अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे आवाहन

धुळे- पत्रकारांना असलेले अधिकार, बंधने, संधी, समस्या, अडचणी यांचा उहापोह अधिवेशनात होत असतो. अधिवेशनातून संघटनेची ताकद सरकार व प्रशासनाला कळते व दबाव निर्माण होतो. त्यासाठी अशी अधिवेशने गरजेची आहेत. त्यामुळे अधिवेशन यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचलून प्रत्येक पत्रकाराने जबाबदारीची जाणीव स्विकारावी, असे आवाहन अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथे अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे होऊ घातलेल्या 44व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या नियोजनाची बैठक नुकतीच जांबुळकर गार्डनमध्ये पार पडली. बैठकीला मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर, जिल्हा समन्वयक सुनिल जगताप, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, पुणे जिल्हा सचिव सतीश सांगळे, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, सोशल मिडिया प्रमुख जनार्दन दांडगे, हवेली प्रमुख बापूसाहेब काळभोर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा प्रमुख के. डी. गव्हाणे, हवेली तालुका सोशल मिडिया प्रमुख गणेश सातव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, अधिवेशनाला दोन महिने राहिले आहे. त्यामुळे २४ तास अधिवेशनाचा विचार माझ्या डोक्यात आहे. अधिवेशन भव्य-दिव्य होणार यात शंका नाही. नियोजनासाठी दर आठ दिवसाला बैठक घेऊ. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक आकर्षक व वाचनीय अशी स्मरणिका आपण काढत आहोत. या स्मरणिकेसाठी सर्वांनी योगदान करावे, पत्रकारांनी जास्तीत जास्त जाहिराती मिळवाव्यात, स्मरणिकेतील जाहिरातींसाठी आकर्षक कमिशन आहे. ‘कुटुंब ॲप’च्या माध्यमातून परिषदेची व्याप्ती वाढतेय. ‘कुटुंब ॲप’ सर्वांसाठी आहे. इतर संघटनांच्या पत्रकारांनी हे ॲप स्विकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्या संघटनेचा मुळ उद्देश समोर येत आहे. आपण पारदर्शक आहोत काही लपवण्याची  गरजच नाही. जास्तीत जास्त पत्रकारांनी सदस्य झाले पाहिजे. ॲपवरचे सर्व लोक परिषदेचे सदस्य आहेत असे कोणी समजू नये. परिषदेची चळवळ थांबणार नाही. परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय अधिवेशनाची गरज का असते हे सांगत, अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यभरातील पत्रकारांची ओळख होते. त्यांच्या भागातील समस्या व उपलब्धी लक्षात येतात. दर्जेदार लिखाणातून स्मरणिका काढण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जाहिराती स्विकारल्या जातील. त्यासाठी आकर्षक दर असुन भरघोस कमिशन मिळेल. स्मरणिकेच्या माध्यमातून पत्रकारांना थोडे उत्पन्नाचे साधन होईल असे सांगितले.

 विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांनी, प्रत्येक तालुका संघाने आर्थिक भार उचलण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर यांनी बैठकीचे उत्तम नियोजन करीत सर्व तालुकाप्रमुख व व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले.

 

पुणे जिल्हा समन्वयक सुनिल जगताप यांनी प्रास्ताविकात अधिवेशनाचे काय नियोजन करायचे, काय अपेक्षित आहे याचा उहापोह केला. अधिवेशन काळात वापरायचा लोगो, लेटरपॅड, शिक्के, बँक खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू आहे. भोजन व्यवस्थेचे कोटेशन येत आहेत. मंडप नियोजन सुरु आहे. वाजवी दरात जे आपल्याला सेवा देतील त्यांच्याकडून काम करुन घेतले जाईल. किती पत्रकार येणार आहेत. त्यांचा निवास, भोजन यासाठी गुगल नोंदणी करण्याची सोय करण्याचे नियोजन होत आहे. शाळेच्या 90 खोल्या आहेत, पण 1 हजार ते 1200 लोकांची एकाच ठिकाणी कशी सोय होईल यासाठी एका बिल्डरकडून एकाच इमारतीत सोय होईल हे पाहत आहोत. प्रत्येक तालुक्याने या अधिवेशनात सहभागी व्हावे. प्रत्येक तालुका अध्यक्षांना विचारात घेऊन नियोजन सुरु आहे. असे मत समनवयक सुनिल जगताप यांनी मांडले.

बैठकीला हवेली प्रमुख बापूसाहेब काळभोर, पुरंदरचे अध्यक्ष राहुल शिंदे, शिरुरचे अध्यक्ष संजय बारहाते, खेडचे अध्यक्ष हणुमंतराव देवकर, दौंडचे रविंद्र खोरकर, जुन्नरचे अध्यक्ष अतुल  कांकरीया, बारामतीचे सोशल मिडिया प्रमुख महेश जगताप, भोरचे अध्यक्ष वैभव भुतकर, पुणे शहर अध्यक्ष बाबा तारे, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अनिल वडघूले, सुनील वाळुंज, दत्तानाना भोंगळे, महिला प्रतिनिधी श्रावणीताई कामत, जिल्हा महिला प्रतिनिधी सुनिता कसबे - जाधव, कांचन सर्व सोशल मिडिया प्रमुख व तालुका संघांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सुत्र संचालन व उपस्थितांचे स्वागत जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर यांनी केले, प्रास्ताविक सुनिल जगताप व बैठकीला उपस्थितांचे आभार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी मानले.

 



 

 


Post a Comment

0 Comments