*धुळे* जिल्ह्यात जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची सुत्रे प्रवीणकुमार पाटील यांनी स्वीकारली. धुळे जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या क्षेत्रात एक नवीन पर्व सुरु झाले. अर्थात असे म्हणताना बदलून जाणारे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या कारकिर्दिचीही नोंद आवश्यक ठरते. धुळे जिल्ह्याच्या पोलिसी इतिहासात काही चांगल्या कर्तव्य तत्पर, संवेदनशील, समाजशील अशा पोलिस अधिकाऱ्यांच्या यादित चिन्मय पंडित यांचे नाव नेहमी घेतले जाईल. त्यांच्या काळात बरेच गंभीर गुन्हे एलसीबीच्या माध्यमातून शोधले गेले. दोंडाइचा जवळच्या मेथी येथे राज्य मार्गावर भर दिवसा खून करणाऱ्या आरोपींना नरकातूनही शोधून काढेन, अन्यथा राजीनामा देईन, अशी घोषणा एखाद्या संतप्त जमावासमोर संवेदनशील मन असणारा अधिकारीच करु शकतो. त्याप्रमाणे अवघ्या काही तासात त्यांनी आरोपी जेरबंद केले सुद्धा. शहरातील नागरिकांवर दहशत बसविण्याच्या मार्केटिंगच्या उद्देशाने संपूर्ण शहर वाढदिवसाच्या बॅनरने भरून टाकणाऱ्या पैलवानांचे रस्त्यावर उतरून बॅनर स्वतः फाडून गुन्हे दाखल करण्याच्या त्यांच्या कारवाईचे धुळे शहरात खूप स्वागत झाले. " शहरातील नागरिकांवर दहशत बसविण्यासाठी कुणी गुंडगीरी करीत असेल, तर ते चालणार नाही.जनतेच्या हितासाठी पोलिसांपेक्षा मोठा गुंड कुणी नसावा " अशी त्यांची भुमिका होती. त्यांच्या कारकिर्दिची जिल्ह्यात प्रशंसा झाली आहे. धुळे शहर व जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यात शंकाच नाही. वर्षानुवर्ष ही गुंडगिरी वाढत आहे. ही वेगाने वाढती गुंडागिरी व गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी अजुन खूप मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. नवीन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्या दृष्टिने निर्धार केला आहे. ही चांगली बाब आहे. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटलांना धुळे शहर नवीन नाही. जळगाव व धुळे जिल्ह्यात पूर्वी त्यांचे वास्तव्य राहिले आहे. आता धुळे शहर खूप बदलले आहे असे त्यांना वाटते. धुळे शहर व जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याचे क्राईम चार्ट वरून त्यांच्या निदर्शनास आले आहे. सोशल पोलिसिंग व जनतेच्या मदतीने शहर व जिल्हा गुन्हेगारी मुक्त करावयाचा त्यांचा मानस आहे. शहरातील वाढत्या चोऱ्या व घरफोड्यांचे गुन्हे त्यांनी पिन पॉईंट केले आहेत. जीवघेण्या अपघातांचे प्रमाणही खूप मोठे आहे. वर्षभरात अडिचशेहून अधिक अपघाती मृत्यू झाले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी मनपाच्या मदतीने सोडविण्याचा त्यांचा मानस आहे. मनपाच्या मदतीने याबाबत काम करण्याचा प्रयत्न या आधी अनेक अधिकाऱ्यांनी केला आहे. शेवटी वैतागून हात टेकून त्यांनी प्रयत्न सोडून दिले आहेत. आता प्रवीणकुमार पाटलांनीही प्रयत्न करावयास हरकत नसावी. याशिवाय नवीन पोलिस अधीक्षकांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे, ते हे की धुळे जिल्हा हा अवैध बनावट दारू, गांजा, इतर अमली पदार्थांचा हब म्हणून राज्यभर प्रसिद्धी पावला आहे. या जिल्ह्यात मोठमोठ्या ब्रॅन्डची दारु बनविण्याचे उद्योग व मोठ्या क्षेत्रावर गांजा लागवडीचे उद्योग सुरु आहेत. बनावट दारूसाठी मोठ्या प्रमाणावर स्पिरिट या जिल्ह्यात येते .विशेषतः शिरपूर तालुक्यात दारु गांजाचा व्यवसाय प्रचंड फैलावला आहे. त्यांच्यावर सट्टयाच्या कोटा रेड होतात, त्याप्रमाणे बनावट दारु स्पिरीटच्या व गांजा शेती साठ्याबाबत कोटा रेड होतात. सांगवी ,लाकड्या हनुमान रोहिणी भोईटी, बोराडिचा उत्तर भाग वगैरे पहाडपट्टीच्या पायथ्याशी इंटेरीयर मध्ये विशेषत: म. प्र . वगैरे भागातील मंडळींनी आदिवासींना हाताशी धरून शेकडो एकर गांजा लावला आहे. काही मंडळींनी तर रस्त्याच्या खाली अंडरग्राउंड गोदामे बांधून वरून स्लॅब टाकून नैसर्गिक वाटावी अशी जमीन तयार केली आहे. नवीन माणसांना या अंडरग्राउंड गांजा गोदामांबाबत जरा सुद्धा शंका येवू शकत नाही. धुळे शहरात चौकाचौकात खंडणी टोळ्यांचे साम्राज्य वाढले आहे. लहान लहान, छटाक छटाक, टीन एजर पोरांमध्ये या टोळ्यांचे भाई , दादा , फाईटर, टायगर वगैरे वगैरेंचे आकर्षण वाढते आहे. " भाई की झलक सबसे अलग " अशा स्लोगन सह किलो अर्धा किलो सोने लेवून, सोफ्यावर पसरून बसणारा उग्र चेहऱ्याचा झिपऱ्या भाई ही लहान लहान पोरं बॅनरवर बघतात, तेव्हा त्यांच्यात आपसुकच आकर्षण निर्माण होते व गलोगली, चौकाचौकात अशा खंडणी टोळ्या उगवतात. त्यातून चोऱ्या , घरफोड्या, हाणामाऱ्या , गावठी कट्टे , चॉपर , तलवारी सारे सारे प्रकार वाढत जातात. याशिवाय फसव्या स्कीम, हनी ट्रॅप वगैरेत फसवून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्या. ट्रकांमधुन ड्रायव्हरच्या संगनमताने हवा तो माल उतरविणाऱ्या हायवे काट्यांचे भारतभर प्रसिद्ध असणारे धंदे . चोरीचे डंपर, हायवा, ट्रक , टॅन्कर व इतर वाहने काही तासातच पार्ट पार्टमोकळे करून ते वाहन होत्याचे नव्हते करणारे देशातले सर्वात मोठे केंद्र . या सर्वावर नियंत्रण आणण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. हे आव्हान ते पेलतील अशी आपण अपेक्षा करू या !
(*दै. पथदर्शी, साभार
0 Comments