विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 6 जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान तर निकाल 14 डिसेंबरला जाहीर होणार आहे. मुंबईतील दोन, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलढाणा वाशिम, नागपूर या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर हा निवडणूक होणार आहे.
मात्र सर्वांच लक्ष मुंबईच्या दोन जागंवरती आहे. कारण मुंबईतील महाविकास आघाडीच्या दोन भाईंच्या जागा धोक्यात आल्या आहेत. या निवडणुकीत 77 नगरसेवकांनी पहिल्या पसंतीचे मत दिल्यानंतर सदस्याचा थेट विजय होतो. काँग्रेसचे संख्याबळ 29 आहे. त्यामुळे काँग्रेससाठी स्वत:चा सदस्य निवडून आणणे अशक्य बनले आहे. त्यामुळे पक्षाच्या मुंबई अध्यक्षांचीच विधिमंडळातील खुर्ची धोक्यात आली आहे.
काँग्रेसला आपला सदस्य निवडून आणायचा झाल्यास 48 नगरसेवक फोडावे लागतील. महापालिकेतील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एवढे नगरसेवक फोडणेअवघड आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता धूसर झाली आहे. भाई जगतापांच्या बरोबरच शिवसेनेचे रामदास कदमही सलग दोन वेळा मुंबई महापालिकेतून निवडून गेले आहेत. परंतु, गेल्या विधान परिषद निवडणुकीपासून शिवसेनेने रामदास कदम यांना बाजूला फेकल्याचे चित्रआहे. त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे.
मुंबई पाठोपाठ कोल्हापूरची जागेवरती ही मोठ्या प्रमाणात चुरस आहे. कारण गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालक मंत्री सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. महाविकास आघाडी कडून सतेज पाटील तर भाजपकडून अमल महाडिक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गोकुळच्या वादाची थिणगी ही या निवडणुकीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागपूरमधील गिरीश व्यासांच्या जागेवर ही चुरस पाहायला मिळणार आहे. कारण गिरीश व्यासांच्या जागेवर आधी कॉंग्रेसचे राजेंद्र मुळीक यांनी बाजी मारली होती. ते ही आता कामाला लागले आहेत. गिरीश व्यास यांना जवळपास उमेदवारी मिळतं असली तरी भाजप चे उपाध्यक्ष संजय भेंडे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विक्की कुकरेजा यांनी ही उमेदवारी मागीतली आहे. त्यामुळे तिथे ही नाराजी नाट्य होण्याची शक्यता आहे.
धुळे नंदुरबार हा अमरिश पटेल यांचा बालेकिल्ला मानला जात असला तरी महाविकासआघाडी कशी व्युहरचना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला वाशिम बुलढाणामध्ये 'गोपीकिशन बाजोरिया जरी असले तरी वंचित बहुजन आघाडीची ताकद या ठिकाणी असल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी ठरू शकते.

0 Comments