Header Ads Widget

*पोलिस दलाची कामाची सुरुवात तर चांगली झाली!*





         *धुळे*  शहर व जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पोलिस दलाने एक पाठोपाठ एक मोठमोठ्या कारवायांचा धडाका लावला आहे. यामुळे जनमानसात समाधान आहे. धुळे शहर व जिल्ह्यात पोलिस दलाचे अस्तित्व जाणवू लागले आहे. एरव्ही पोलिस दल हे नेहमीच माध्यमांमध्ये टीकेचे धनी असते. जनमानसातही पोलिस यंत्रणेविषयी  नेहमी रोष असतो. नागरिकांच्या जिवित व वित्ताचे रक्षण करणे, तपासकाम करणे , कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे ही पोलिस दलाची मुख्य कर्तव्य आहेत. नागरिकांना यापेक्षा फार काही जास्त अपेक्षा नसतात. ही कामे करणारे अधिकारी जनतेच्या मनात घर करतात. गुजरात मधील एका पोलिस अधिकाऱ्याचा बदलीनंतर निरोपाचा व्हिडिओ आला आहे. ते निघत असताना जनता त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत आहे .डोळ्यात अश्रू आहेत . असे त्यात दिसते. या अगोदर ग्रामीण भागातील एका शिक्षकाचा व्हिडिओ आला होता . निरोप घेवून निघताना  लहान लहान विद्यार्थी - विद्यार्थिनी ढसाढसा रडत होते . असे प्रेम फार थोड्या अधिकाऱ्यांच्या नशिबी असते. यासाठी फारसे वेगळे काही करावे लागत नाही . आपल्या प्रामाणिक कामालाच पूजा समजून आपले कर्तव्य बजावत राहिले तर फारसे अवघड नाही. अन्यथा धुळ्यात असेही एक डिएसपी आले होते .बदली झाल्यावर रात्रीच्या अंधारात गुपचूप सामान भरून त्यांना निघुन जावे लागले होते. धुळ्याने अरविंद इनामदार , आर के सहाय, एस चैतन्या सारखे जनतेच्या मनात घर करणारे डिएसपी देखील बघितले आहेत. काल एक मोठी इराणी गॅन्ग धुळे पोलिसांनी पकडली . सव्वा लाखाचे दागिने , स्कार्पिओ, मोटारसायकली वगैरे ७ लाखाचा माल जप्त केला . सीबीआय आयकर आधिकारी वगैरे भासवून ते वृध्दांना लुटत असत . धुळे जिल्ह्यातच ५ गुन्ह्यात ते हवे होते . नंदुरबार नाशिक जिल्ह्यात त्यांच्यावर तब्बल ६० गुन्हे आहेत. ही एक मोठी कारवाई आहे. या आधी धुळ्यात मिल परिसरात बनावट दारूचा मोठा अड्डा उघडकीस आणला. २२ खोके दारु , १०५ लिटर स्पिरिट वगैरे सव्वातीन लाखाचा माल पकडला . चौघांना अटक केली.  शिरपूर तालुक्यात उस तोड मजुर ठेकेदाराचे ७२ हजार रुपये लुटणाऱ्या ६ आरोपींना काही तासातच ताब्यात घेतले .नेरला २ लाख १६ हजाराचा  गुटका पकडला . हाडाखेडला दोन गावठी कट्टे त्या आधी एक गावठी कट्टा पकडला . बायोडिझेल पंपावर कारवाई पाठोपाठ जुनवण्यास हॉटेल मागे टॅन्कर  मधून चोरून ऑईल उतरविताना झालेली कारवाई . आता धुळ्यात अवैध कत्तल खान्यातील १७  टन गोवंश मासाची जप्ती व १७ जनावरांची सुटका ही एक मोठी कारवाई झाली . शहरात थंड बस्त्यात  गेलेली वाहतूक शाखाही बऱ्यापैकी सक्रीय झाली आहे .नो पार्किंग झोनची अंमलबजावणी व अवजड वाहनांना प्रवेशबंदींची अंमल बजावणी होत आहे . नो पार्किंग झोनच्या अंमल बजावणी सोबतच शहरात मनपाने पार्किंग झोन व हॉकर्स झोनची अंमलबजावणी करावी . यासाठी     पोलिस दलाने मनपाचा पिच्छा पुरवावा. यात मनपावाल्यांना खाण्यासारखे काही दिसत नाही, म्हणून वर्षानुवर्ष या बाबीकडे ते लक्ष देत नाहित. हॉकर्स झोनबाबत तर सुप्रिम कोर्टाचे निर्देश आहेत तरीसुध्दा त्याचे गांभिर्य नाही. पोलिस दलाच्या वाहतूक कामाशी संबंधित हे विषय आहेत. पोलिस दलाने या दोन बाबतीत बऱ्यापैकी त्यांना आर टोचत राहिल्यास,  हे विषय देखील मार्गी लागू शकतात. जिल्ह्यात पोलिस दलाचे प्रमुख म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण पाटील , अपर पोलिस अधीक्षक  प्रशांत बच्छाव , उपअधीक्षक दिनकर पिंगळे,  अनिल माने , एलसीबी, शहर व अन्य प्रभारी अधिकारी यांचे नेटवर्क बऱ्यापैकी कामास लागलेले दिसते . हाच वेग कायम राहिला तर धुळे शहर व जिल्ह्यातील त्रस्त जनतेला बऱ्यापैकी दिलासा मिळेल . जनतेच्या अपेक्षा फार लहान असतात. त्या पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना जनता मनापासून दुवा देते . धुळ्यात पोलिस दलाची कामाची सुरुवात तर चांगली झाली आहे.  हाच वेग व तळमळ कायम राहो हीच अपेक्षा !
दै. पथदर्शी, साभार

Post a Comment

0 Comments