धुळे: धुळे-नंदूरबार जिल्हा बँकेच्या चालू खात्यात नंदुरबार जिल्हा परिषदेचा 69 कोटी रुपयांचा निधी गेल्या दहा वर्षापासून असून बँकेकडे वारंवार मागणी करूनही पाहिजे त्या प्रमाणात ठेवी परत दिल्या जात नसल्याने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा बँकेतील ठेवींसंदर्भात बँकेला नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने बँकेला नोटीसही देण्यात आली मात्र योग्य ते उत्तर न मिळाल्याने बँकेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या विकासकामांचे कोट्यावधी रुपये जिल्हा बँकेतील या चालू खात्यात असल्याने जिल्हा बँक त्या रकमेवर व्याजही देत नसल्याने जिल्हा परिषदेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा जिल्हा परिषदेतील सदस्यांकडून केला जात आहे. जिल्हा बँकेने योग्य ते उत्तर न दिल्यास आणि ठेवी वेळेत परत न केल्यास धुळे जिल्हा बँक आणि नंदुरबार जिल्हा परिषदेतील संघर्ष अधिक तीव्र झालेला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
0 Comments