Header Ads Widget

आमदारांचे उत्पन्न वाढले. जबाबदारी वाढली.




     महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात अर्थमंत्री मा.अजितदादांनी वार्षिक  आमदार निधी पांच कोटी केला.निधीतून २०% कमीशन आमदाराचे असते.नव्हे आमदाराच्या हक्काचे असते.त्यामुळे आमदाराचे अनधिकृत आणि पारंपरिक उतपन्न वार्षिक एक कोटी ने वाढले.नियमित येणारे वार्षिक  मानधन सुमारे दहा लाख आणि हे एक कोटी त्यामुळे आमदारांनी आता प्रामाणिकपणे कामे केली पाहिजे.
     इतके उत्पन्न मिळाल्यावर आता आमदारांनी दारू विकणे,दारू पाडणे,रेतीचे धंदे करण्यासाठी, पानटपरी चालवणे,किर्तन ,तमाशा,ऑर्केस्ट्रा यात नाचगाणे करणे,ब्युटी  पार्लर चालवणे, स्पॉ सेंटर चालवणे ही कामे करू नयेत.पुर्णवेळ राजकीय प्रतिनिधी ची विधीवत कामे करावीत.पांच लाख लोकांचा प्रतिनिधी जर लक्ष देऊन काम करीत असेल तर त्याला संध्याकाळी देशी,खानदेशी,विदेशी पिण्यासाठी,चखणा खाण्यासाठी वेळ मिळणार नाही. किंवा रंगेलिया मनवण्यासाठी वेळ मिळणार नाही. सकाळी ११ ते ६ पर्यंत जरी आमदाराने जनतेला तोंड दिले तर कुठेही रेस्ट हाऊसमध्ये  पाय देण्याची गरज पडणार नाही.उलट बायको पोरांबरोबर सकाळ संध्याकाळ जेवण केले तर कुटुंब व्यवस्था टिकून राहिल.आई, बाप,भाऊ, बहिण,काका,चुलते सोबत सहवास मिळेल.त्यामुळे अंगवस्र ठेवणे किंवा लिव्ह इन रिलेशनशिप ठेवणे,अनौरस मुले जन्माला घालणे असे प्रश्न उद्भवणार नाहीत.
      आमदारांनी विधानसभा अधिवेशन समयी बायको पोरांना मुंबईत नेले तर वात्सल्य, प्रेम,माया टिकवून ठेवता येईल.अधिवेशन आटोपले कि  बायकोला घेऊन चौपाटीवर फेरफटका  मारला तर कोणी सटवी मागे लागणार नाही. त्यामुळे खडसे सांगतात तशी सीडी बीडीचा प्रकार घडणार नाही.अनेक आमदार खासदार बिचारे मुंबईत अधिवेशनात एकटे गेल्यामुळे  कोणीतरी अंगलट करून व्हिडीओ काढले.ते दाखवून किंवा सांगून ब्लैकमेलींग केले.काहींचे मंत्री पद गेले.काहींचे तिकीट गेले.काहींचे वस्रहरण झाले. अशा आमदाराला आता बहिण सुद्धा भाऊबीज ला बोलवत नाही. राखी बाँधायला सुद्धा टाळते.म्हणून बरेचसे आमदार कुठेतरी महिला सुधार गृहात जाऊन राखी बांधून घेतात.पेपरला फोटो टाकून बहिण पाव्हण्याला खजिल करतात.
     काही चालू आमदार बायकोची कटकट नको किंवा मुंबई जातांना पाठीमागे लागायला नको म्हणून इकडे एखादे पद जसे नगराध्यक्ष, महापौर, बँकेचे संचालक किंवा झेडपी किंवा पंचायत समिती ,देऊन खुष ठेवतात. म्हणजे इकडे गावाकडे अडकवून ठेवतात.जेणेकरून भलतासलता संशय घेऊ नये,अनपसनप आरोप करू नये.सर्व सत्ता तुमच्याच घरात,असे कुत्सितपणे म्हणणाऱ्या भोळ्याभाबड्या ,जळाऊ लोकांना हे गणित माहिती नसते.आमदाराच्या पीए किंवा ड्राईव्हरला हे माहिती असते.म्हणून बहुधा असेच आमदार पकडले गेलेत व अडचणीत आलेत.कोणी नाशीकला,कोणी ठाण्याला ,कोणी रेस्ट हाऊसमध्ये, कोणी हॉटेलमध्ये ,कोणी तर ट्रेनमधे.
       महाराष्ट्रातील मंत्र्यांना मुंबईत बंगले दिलेत.तेथे खानपान, चुल्हा चक्कीची सोय असते.क्वचित महिलांना ते माहिती असेल.अनेक मंत्र्यांनी धर्मपत्नी ला पांच वर्षात ते बंगले दाखवले नाहीत. तू कशाला येते मुंबईत? खुप त्रास होईल. असे सांगून बोळवण करतात. अधिवेशन काळात जिवाची मुंबई करतात.ते तिकडे सरकाईले खटिया खेळतात इकडे बिचारी डोक्यावर पदर घेऊन देवपूजा करते.
     मुंबईत समुद्र किनारी आमदार निवास आहे. जेणेकरून आमदार तेथे थाँबतील.विसावा घेतील.पण तेथे एकही आमदार थांबत नाही. तेथे मतदारसंघातील संटर पंटर थांबतात. आमदार दुसरीकडे अलिशान हॉटेलमध्ये थांबतात.तो इंतजाम पीए आणि चालक करतात. या पीए आणि चालकांकडे खूप गॉसीप असते.त्याचा आर्थिक फायदा त्यांना मिळतो. आमदार सोबत तो सुद्धा श्रीमंत होतो.मक्ते घेतो.कालपरवा सायकल घेण्याची ऐपत नसलेला पीए आज बुलेरोने लघवीला जातो.मुषकराव इतका श्रीमंत होतो तर गणपतीराया किती श्रीमंत होत असेल?

....शिवराम पाटील.
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच.
जळगाव.

Post a Comment

0 Comments