Header Ads Widget

खानदेशात अवकाळीचा दणका; वीज पडल्याने विवाहिता ठार



लामकानी : महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच बोरसुले (ता. धुळे) येथे वीज पडल्याने २५ वर्षीय महिला जागीच ठार झाली. शीतल राकेश गिरासे असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्‍यान जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्‍ह्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांची दाणाफाण केली.

शीतल गिरासे घराच्या शेतात निंदणी करीत असताना, दुपारी साडेतीनच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट सुरू झाला. वीज अंगावर पडल्याने शीतल गिरासे जागीच ठार झाल्या, तर त्यांची भाची गायत्री इंद्रसिंग गिरासे (रा. रजाळे, ता. नंदुरबार) जखमी झाली. शेतातील दुसऱ्या क्षेत्रात खत तयार करण्याचे काम करीत असणारा पती राकेश मंगलसिंग गिरासे व लांब अंतरावर असलेली पाच वर्षीय मुलगी प्रांजल वाचले.

मोठ्या आवाजाने ते भयभीत झाले. शीतल यांना मुलगी प्रांजल व दोन वर्षांचा नीतेश मुलगा आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आईच्या मृत्यूने मुले पोरकी झाली. आई शेतातून परत येईल व आपल्याला कुशीत घेईल, अशी आस लागलेल्या नीतेश घरी जमलेली गर्दी व रडणारे नातेवाईक बघून आई कुठे आहे, असे विचारात पडला. घटनेची माहिती कळताच बोरीसचे उपसरपंच नारायण गिरासे यांनी घटनास्थळी धाव घेत शीतल हिला तात्काळ दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून शीतलला मृत घोषित केले. शीतलचे शव मंगळवारी (ता. ८) जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार असून, विच्छेदनानंतर नातेवाइकांच्या ताब्यात दिले जाणार आहे. बोरसुले येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

धुळ्यातही हजेरी

शहर व जिल्ह्यात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाची हजेरी तुरळक स्वरूपाची होती. मात्र, एकूण वातावरण बदल्याने हवेत गारवा निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून पारा पुन्हा वर चढल्याने उन्हाळा सुरू झाली. त्यातच सोमवारी (ता. ७) दुपारपासूनच वातावरण बदलले. एव्हाना दुपारी उन्हाची तीव्रता वाढते. मात्र, सोमवारी ढगाळ वातावरण राहिल्याने उन्हाची तीव्रता जाणवली नाही. त्याचच सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यानंतर पुन्हा पाऊस झाल्याने काही नागरिकांनी छत्री, रेनकोटचा आधार घेतल्याचेही पाहायला मिळाले. रस्त्यावरील छोट्या विक्रेत्यांचीही तारांबळ उडाली.

Post a Comment

0 Comments