शिरपूर तालुक्यातील सावळदे नजीक तापी नदीच्या पुलावरून कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून पुणे येथून मध्य प्रदेशकडे एक आयशर कुरकुरे घेऊन जात होता. हा आयशर (क्र. सीजी 07 सी जी 8970) शिरपूर तालुक्यातील सावळदे गावा नजीकच्या तापी नदीच्या पुलावर आला असता चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक कठडे तोडून तापी नदीच्या पात्रात कोसळला. या अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने नदीच्या लगतचे शेतकरी तसेच महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. दरम्यान नरडाणा पोलीस देखील घटनास्थळी पोहोचल्याने त्यांनी शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. तर वाहतूक देखील ठप्प झाली. शोध मोहीम राबवणाऱ्या तरुणांनी नदीपात्रामध्ये जाऊन चालक आणि क्लिनर यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र पाण्यातून वाहत जाणाऱ्या एकाला मच्छीमारांनी बाहेर काढले. हा व्यक्ती दिलीप अमरसिंग ब्राह्मणे नावाचा असून तो बुडालेल्या ट्रकचा क्लीनर आहे. तर चालक धर्मेंद्र डावर याला शोधण्याची मोहीम सुरु आहे.
दरम्यान या घटनेची माहिती कळाल्याने शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे, शिरपूरचे प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार आबा महाजन यांनी घटनास्थळावर धाव घेऊन मदत कार्य सुरू ठेवले.
0 Comments