Header Ads Widget

नरडाणा औद्योगिक वसाहतीतील आणखी एका सिमेंट कंपनी विरुद्ध राष्ट्रवादीचे निवेदन (सतीश चोरडिया नरडाणा)




नरडाणा :- नरडाणा येथील औद्योगिक वसाहतीतील माळीच व वाघोदे गावा जवळ असलेल्या एका सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या विरुद्ध येथील ग्रामस्थांना होत असलेल्या विविध प्रकारच्या त्रासाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सेलच्या वतीने येथील एच आर चे हेड भोसले यांना या संदर्भात एक निवेदन देण्यात आले.


राष्ट्रवादी तर्फे देण्यात आलेल्या या निवेदनात संबंधित सिमेंट कंपनीच्या बॉयलर मधून उडणाऱ्या धुळीकणांमुळे परिसरातील विविध पिकांवर विपरीत परिणाम होत असून कंपनीच्या बॉयलरच्या उष्णतेमुळे विविध शेतातील विहिरी व बोरवेल च्या पाण्याची पातळी कमी होत चालली असून, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विहिरी व बोरवेल बंद पडत चालले आहेत. या खालावत जाणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे शेत मालाच्या बागायती उत्पादनावर मोठा परिणाम होणार असून, परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्तत झाला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की संबंधित सिमेंट कंपनीत दररोज 500 पेक्षा अधिक वाहनांची ये-जा सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या वाहतुकीच्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर दुचाकी वाहन चालवणे सुद्धा जिकरीचे झाले आहे. तसेच शाळेत सायकलीने जाणाऱ्या व पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून कंपनीच्या मध्यााधुंद अवस्थेत व बेभान व भरदार वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांमुळे अनेकदा छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. तसेच या कंपनीत स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देण्यात आलेले नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. 

          जर कंपनीने परिसरातील ग्रामस्थांना होत असलेल्या या सर्वच त्रासावर प्राधान्याने तोडगा काढला नाही, तर संबंधित कंपनी बंद करण्यात येईल व या कंपनीच्या विरुद्ध तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल. असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सेलचे जिल्हा सरचिटणीस चेतन पाटील, लहू भामरे, मयूर सिसोदे, राहुल भामरे, गणेश भामरे, चेतन भामरे, जगदीश सूर्यवंशी, महेंद्र पाटील, आदींच्या सह्या असून हे निवेदन पार्टीचे प्रमुख रणजीत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे जिल्हा सरचिटणीस चेतन पाटील यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments