*धुळे* नंदुरबार जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा पूर्वीचा राज्यमार्ग क्रमांक एकचा भाग असणाऱ्या सोनगीर ते शहादा या मार्गाच्या दुरावस्थे बाबत नेहमीच ओरड होत असते. यापैकी सोनगीर - दोंडाईचा पट्टयात काही काम झाले आहे. परंतु शहादा - सारंगखेडा या टप्प्यात राज्य शासन व केंद्र शासनाने शरमेने मान खाली घालावी, अशी स्थिती आहे. यामुळे केंद्रिय राजमार्ग प्राधिकरण व राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात काही समन्वय आहे किंवा नाही? हा प्रश्न निर्माण होतो. या बाबत जी दीर्घ दिरंगाई सुरु आहे त्यासाठी या विभागांना थोडी तरी लज्जा वाटली पाहिजे. राज्य सांबां विभागाचा संबंध असेल तर शहादा - नंदुरबारचे आमदार व मंत्री ना. विजय गावित इतकी वर्ष काय करीत आहेत? राज्य सांबां विभागाने हा रस्ता केंद्रिय राजमार्ग प्राधिकरणकडे वर्ग केलेला असेल तर शहादा - तळोदा - धडगाव - अक्कलकुवा वाल्यांनी केंद्रामध्ये खासदार हिनाताई गावितांना कशासाठी निवडून पाठविले आहे? हा प्रश्न देखील उपस्थित होतो. आतापर्यंत कितीतरी जनआंदोलने या रस्ताच्या दुरुस्ती मागणीसाठी झाली आहेत. संतप्त नागरिकांना ज्या - ज्या अधिकार्यांनी त्या - त्या वेळी कामाची आश्वासने दिली पण कामे केली नाहित त्या - त्या अधिकाऱ्यांना एखाद्या अपघातग्रस्त वैतागलेल्या नागरिकाने हंटरने चांगले सोलून - ठोकून काढले तर त्याला दोष कसा काय देणार? अर्थात असे कुणी करणार नाही व करूही नये! परंतु हे अधिकारी व ही यंत्रणा आता हंटरने लाल पिवळे करण्याच्याच लायकीची राहिली आहे, अशी या मागे जनभावना असू शकते. गेली दोन तीन वर्षे या रस्त्यावर वाहन चालविणे अवघड झाले आहे. गेल्या सहा महिन्यात तब्बल १६ जणांचा बळी या रस्त्याने घेतल्याचे सांगण्यात येते. जखमी व कायमचे अपंगत्वांची संख्या तर यापेक्षा कितीतरी मोठी असू शकते. शेतकर्यांना या रस्त्यावरून शेतमाल वाहतूक करणे अवघड झाले आहे. या रस्त्यावरून कितीतरी मंत्री - खासदार - आमदार - पालकमंत्री व अन्य नेते वापरतात. चंद्रावर जाण्याच्या युगात व जगातली तिसरी अर्थव्यवस्था होण्याचा नाद करणाऱ्या आणि विश्वगुरू बनणार्या या देशात चंद्रापेक्षा हजारपट अधिक खड्डे असणारा शहादा - सारंगखेडा रस्ता देखील आहे, याचे भुषण या नेत्यांना वाटत असेल काय! अशी लोक भावना आहे. सार्याच नेत्यांना व यंत्रणेला ही शरमेची बाब आहे. शहादा शहरात गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना जवळपास प्रत्येक वक्त्याने शहादा - सारंगखेडा रस्ता दुरावस्थे बाबत खंत व्यक्त केली - संताप व्यक्त केला. या आधी इतकी आंदोलने झाली. त्याचा काही असर निगरगट्ट यंत्रणेवर झालेला नाही. आता शेतकरी मेळाव्यात व्यक्त झालेल्या संतापाचा काय असर त्यांच्यावर होईल? सारीच लाज लज्जा कोळून प्यायलेली ही यंत्रणा आहे. इतके प्रचंड खड्डे व अपघाती मृत्यूंची मालिका घेवून ' शासन आपल्या दारी ' आले आहे. शहादा व परिसरातील नागरिकांनी त्यांचे उत्तमोत्तम स्वागत केले पाहिजे !
(- *योगेंद्र जुनागडे,* धुळे ) साभार
0 Comments