गोकुळाष्टमी हा श्रावण महिन्यात येणारा सर्व बालगोपाळांचा आणि गोविंदांचा आवडीचा सण आहे. कृष्णजन्माच्या या दिवसाला श्रीकृष्ण जयंती, दहीहंडी, श्रीकृष्ण जन्माष्टमी असेही म्हणतात.
या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म मोठय़ा उत्साहात आणि आनंदात संपूर्ण हिंदुस्थानात साजरा केला जातो. विशेषतः कोकणात जास्त उत्साह असतो. श्रीकृष्ण जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना झाला. म्हणूनच या दिवशी गवळणींचा लाडका कान्हा श्रीकृष्ण याचा जन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.
कृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार आहेत असे पुराणात वर्णन आहे. तसेच भगवान श्रीकृष्ण हे वासुदेव आणि देवकीचे आठवे पुत्र होते. या दिवशी बरेचजण गोकुळाष्टमीचा उपवास करतात. सगळीकडेच या दिवशी लहान मुलांपासून ते मोठय़ा माणसांपर्यंत सर्वचजण...
*'आला रे आला गोविंदा आला'*
असा जयघोष करत असतात. दहीहांड़ी म्हटलं की, आपल्या सर्वांच्याच डोळय़ासमोर दिसतात त्या उंचच उंच दहीहंडय़ा आणि ती फोडण्यासाठी उभे असणारे गोविंदा.
भगवान श्रीकृष्णांना दही, दूध, लोणी हे पदार्थ खूप आवडत असे. श्रीकृष्ण चोरून दही खात असे, त्यामुळेच कृष्णाला *माखनचोर* असेही म्हणतात. दही, दूध, लोणी आणि लाह्या, दाणे, लोणचे हे सगळे एकत्र करून बनवलेला पदार्थ म्हणजे काला. त्यालाच *गोपाळकाला* म्हणतात.
श्रीकृष्ण गाई चारताना स्वतःची व सवंगडय़ांची शिदोरी एकत्र करून ते सर्व खाद्यपदार्थ एकत्र करून त्याचा काला करत असे आणि आपल्या सवंगडय़ांसह खात असे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दुसऱया दिवशी गोपाळकाला करतात. गोपाळकाल्याच्या दिवशी दही, दूध, लोणी आणि लाह्या, पोहे, दाणे, लोणचे, मीठ यांचा काला 'गोपाळकाला' करून प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात. तसेच पंजिरीचेही (धणे पावडर, गूळ, खोबरं, सुंठ, खडीसाखर)महत्त्व आहे. दोनही पदार्थ अतिशय चविष्ट असतात.
याच दिवशी दहीदुधाने भरलेली हंडी उंच बांधून ही दहीहंडी सर्व गोविंदा एकत्र येऊन फोडतात. आपल्या या हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये गोकुळाष्टमीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. वृंदावन, मथुरा, गोकुळ, द्वारका या ठिकाणी तर हा सण खूप मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. मथुरा हेच ठिकाण भगवान श्रीकृष्णांचे जन्मस्थान असल्यामुळे तिथे मोठय़ा उत्साहात गोकुळाष्टमी साजरी होते.
हिंदू लोक श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करतात. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करतात, रात्री उशिरापर्यंत जागतात आणि श्रीकृष्ण जन्माच्या वेळेला रात्री 12 वाजता प्रार्थना, पूजा करतात. कथा, कीर्तन होते. गीतापठण करतात. लहानपणीचा फोटो, बाळकृष्ण रूपातला किंवा मूर्ती पाळण्यात ठेवतात आणि जन्मोत्सव करतात.
आधीची उत्सवातील पावित्र्यता आताच्या या आधुनिक आणि बदलत्या जगात बदलली आहे. गोकुळाष्टमी साजरी करताना स्वरूप बदलले आहे. दहीहंडी जास्ती उंच न बांधता, खाली बांधून तिचा आनंद घ्यावा. उंच बांधून मोठी बक्षिसे लावतात. त्यात धोका असतो. संरक्षणासाठी उपाययोजना नसतात. त्या करूनच मगच या दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा आयोजित कराव्यात. कारण दरवर्षी बऱयाच गोविंदांना यामध्ये आपला जीव गमवावा लागतो.
आपण कृष्णं वंदे जगत्गुरू म्हणतो. आपण या जन्माष्टमीनिमित्ताने त्याला प्रार्थना करू…
कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
*गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा...*
0 Comments