Header Ads Widget

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदार संघात भाजपच्या उमेदवारीसाठी आधीच अर्धा डझन इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा



मालेगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदार संघात भाजपच्या उमेदवारीसाठी आधीच अर्धा डझन इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा असताना आता शेतकरी मित्र म्हणून नावलौकिक असणारे आणि भाजप किसान आघाडीचे प्रदेश महामंत्री बिंदूशेठ शर्मा यांनीही उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण हे नाशिक जिल्ह्यातील तीन आणि धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा या धुळे जिल्ह्यातील तीन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. डॉ. सुभाष भामरे हे धुळ्यातील भाजपचे विद्यमान खासदार आहेत. याआधी या मतदार संघातून सलग दोनदा ते निवडून आले आहेत. काही काळ केंद्रात संरक्षण राज्यमंत्री म्हणूनही त्यांना यापूर्वी संधी मिळाली होती. आता तिसऱ्यांदा उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरु केले असले तरी भाजपचे धक्कातंत्र येथे लागू झाल्यास त्यांची वाट बिकट आहे. याशिवाय डाॅ. भामरे यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी लपून राहिलेली नाही. भाजपमधील एका गटाने आधीपासूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध सुरु केला आहे. डाॅ. भामरे मात्र उमेदवारीविषयी निश्चिंत असल्याचे सांगतात. निवृत्त पोलीस अधिकारी डाॅ. प्रतापराव दिघावकर हे भाजपमध्ये आल्याने दिघावकरांच्या रुपाने यावेळी नाशिक जिल्ह्याला संधी देण्यात यावी,असा आग्रह समर्थकांकडून करण्यात येत आहे. दिघावकर हे बागलाण तालुक्यातील रहिवासी आहेत.

Post a Comment

0 Comments