*धुळे, दिनांक 4 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा) :* महसूल सप्ताहानिमित्त शिरपूर तहसील कार्यालयात ‘महसूल दूत उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून महसूल दूत हा उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण देण्यात आले.
शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि महसूल विभागाच्या योजनांबाबत तांत्रिकदृष्ट्या लोकांना शिक्षण देण्यासाठी, तसेच जनजागृत्तीसाठी शिरपूर तालुक्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमधील सामाजिक कार्याची आवड असणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींची 'महसूल दूत' म्हणून निवड करण्यात आली आहे.
या महसूल दूताना शासनाच्या विविध योजनांची माहिती, डिजिटल क्रॉप सर्व्हे, ई-हक्क प्रणाली, तसेच विविध दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्रे या विषयांवर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या निर्देशानुसार हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. महसूल दूतांनी सामान्य शेतकरी आणि महसूल प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणून काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल दूतांचा येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सन्मान केला जाणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात तलाठी श्री. नागलोद यांनी डिजिटल क्रॉप सर्व्हे आणि ई-हक्क प्रणालीबाबत तसेच महसूल विभागाच्या योजनांचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सर्व महसूल दूतांना ओळखपत्रांचे वाटपही यावेळी करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी (शिरपूर) शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, नायब तहसीलदार महेश साळुंखे आदि उपस्थित होते.
00000
0 Comments