दोंडाईचा (धुळे) :
सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर संचलित निवासी मतिमंद विद्यालय, दोंडाईचा येथे दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्था अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापिका सौ. मंदा इंगळे यांच्या सूचनेनुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमानिमित्त शाळा परिसर रांगोळी आणि आकर्षक सजावटीने उजळून निघाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक माननीय श्री शुभमदादा शिवाजीराव साळुंके पाटील यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईचा शहराचे नवनिर्वाचित नगरसेवक माननीय श्री जितेंद्रसिंग गिरासे उपस्थित होते.
सर्वप्रथम बौद्धिक अक्षम विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहभागाने दिव्यांग सक्षमीकरण जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन माननीय अध्यक्षांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर शाळेत आगमन झालेल्या मान्यवरांचे स्वागत, प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून सत्कार करण्यात आला.
प्रस्ताविकात विशेष शिक्षिका सौ. मनीषा घुगे यांनी दिव्यांग दिनाचे उद्दिष्ट, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधांचे स्वरूप आणि शाळेत चालणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुणे नगरसेवक श्री गिरासे यांनी दिव्यांगांच्या सक्षम पुनर्वसनाबाबत मार्गदर्शक विचार मांडले. विशेष शिक्षक श्री कमलेश पाटील यांनी दिव्यांगांच्या भावना व्यक्त करणारी हृदयस्पर्शी कविता सादर केली.
अध्यक्षीय भाषणात श्री शुभमदादा साळुंके पाटील यांनी दिव्यांगांचे हक्क, उपलब्ध शासकीय योजना तसेच दिव्यांगांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली. संस्था अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील यांनी सर्वांना दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सायकॉलॉजिस्ट श्री किशोर शेलार यांनी, तर आभार प्रदर्शन अधीक्षक श्री प्रवीण पाटील यांनी केले.
शेवटी सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे आणि चॉकलेटचे वाटप करून कार्यक्रमाचा आनंदी समारोप करण्यात आला. सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे जागतिक दिव्यांग दिनाचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरले *✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी प्रतिनिधि दोंडाईचा*.
0 Comments