शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्क आणि मागण्यांसाठी मुंबईत मंत्रालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर करण्यात आलेल्या कथित बेकायदेशीर अटक, बळाचा वापर व दडपशाहीच्या कारवाईविरोधात शिंदखेडा तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि आदिवासी काँग्रेस जिल्हा धुळे यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेड्याचे मा. तहसीलदार यांना सविस्तर निवेदन देत या संपूर्ण प्रकरणाचा कठोर निषेध नोंदविण्यात आला आहे.
आदिवासी आश्रमशाळांतील गैरसोयी, शैक्षणिक व मूलभूत सामाजिक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिकहून पायी लाँगमार्च करत आदिवासी विद्यार्थी मुंबईत दाखल झाले होते. आंदोलनाची परवानगी न मिळाल्यामुळे हे विद्यार्थी आणि त्यांचे शिष्टमंडळ रात्री दादर येथील काँग्रेसच्या ‘टिळक भवन’ कार्यालयात मुक्कामास थांबले होते. यादरम्यान, मध्यरात्रीनंतर पोलीस प्रशासनाने टिळक भवन परिसरात बळाचा वापर करून विद्यार्थ्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याची कारवाई केली. लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार असताना प्रशासनाने केलेली ही कारवाई अत्यंत निंदनीय व अवाजवी असल्याचे शिष्टमंडळाने म्हटले आहे.
**निवेदनातील प्रमुख मागण्या:*
1) टिळक भवन, मुंबई येथे आश्रयाला असलेल्या आदिवासी विद्यार्थी व त्यांच्या सहकार्यांना ताब्यात किंवा अटक करण्याची नेमकी कारणे शासनाने तात्काळ स्पष्ट करावीत.
2) संबंधित विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची कोणतीही राजकारण न करता सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
3) विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था भंग केली नसल्यास त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले बळजबरीचे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत.
4 ) दडपशाहीचा बडगा उगारण्याऐवजी शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक मागण्यांवर सकारात्मक संवाद साधून तातडीने उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी.
5) विद्यार्थ्यांना आपले प्रश्न मुख्यमंत्री व संबंधित विभागांसमोर संविधानिक मार्गाने मांडण्याची मुभा दिली जावी आणि दोषी पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई व्हावी.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे शासनाचे कर्तव्य असताना त्यांच्याशी दडपशाहीचा पवित्रा घेणे गंभीर आहे. जर या प्रकरणी योग्य ती दखल घेतली गेली नाही, तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र स्वरूपाचे लोकतांत्रिक व संविधानिक आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा आदिवासी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी धुळे जिल्हा आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे यांच्यासह तालुका काग्रेस अध्यक्ष सुनील चौधरी, राहुल पाटोळे, परीक्षित देशमुख, सुनील सोनवणे,अजय भोई, महेंद्र मालचे, दिपक ठाकरे, भटू भिल, रामभाऊ भिल, रमेश महाले सह
स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments