Header Ads Widget

साक्री रोड म्हणजे ‘बारासनी माय, अन्‌ खाटलावर जीव जाये’ श्वानांनी ‘अपनी टोली जिंदाबाद’ म्हटले, तर मग कशाला कुणाचे काय बिघडले!




धुळे शहरातील साक्रीरोडवरील सिंचनभवन चौकातील श्वान टोळीचे आज सकाळी घेतलेले हे छायाचित्र. हा चौक तसा धोकेदायकच आहे. माणसांची आणि श्वापदे गुरे-ढोरांचीही सतत वर्दळ असलेला चौक. याच चौकाने काही वर्षापूर्वी एका सायकलस्वार निरपराध शालेय कन्येचा अपघाताने बळी घेतला. अधून-मधून जायबंदीच्या आणि वाहनचालकांच्या हमरीतुमरी व हातघाईच्या घटना रोजच येथे घडत असतात. रोजच जवळच असलेल्या बँका, एटीएम आणि भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या  चारचाकी व दूचाकी स्वारांची भररस्त्यात लागणारी वाहने हा सर्वच प्रकार बेशिस्तीचा अत्युच्च कळसच म्हणावा लागेल. 

साक्री रोड म्हणजे बेवारस. अहिराणीत एक म्हण आहे, ‘बारासनी माय अन्‌ खाटलावर जीव जाय’. साक्री रोड परिसरातील कॉलन्यांमध्ये सर्वच पक्षांचे कर्ते करविते, नेते कार्यकर्ते सर्वच खात्यांचे उच्चपदस्थ अधिकारी कर्मचारी, कंगला आणि करोडपती, व्यापारी आणि सर्वच रोगांवर  रामबाण ईलाज करणारे धन्वंतरी  राहतात. त्यांचीही साक्रीरोडच्या वर्दळीत म्हटले तर भर आहेच. शेवटी भरीस भरच! हे सर्वच साक्रीरोडवासी म्हणवून घेण्यात अभिमान बाळगतात. पण साक्रीरोडच्या बिघडलेल्या प्रकृतीकडे कुणालाही लक्ष देण्यास वेळ नाही. सर्वांनी मिळून साक्री रोडचा ‘भनका’ करायचे ठरविलेच आहे. मग या श्वानांनी काय कुणाचे घोडे मारले? अर्थात घोडे-गाढवही आता अस्ताकडे निघाले आहेत. त्यांची जागा श्वानांनी घेतली तर बिघडले कुठे? या श्वानांचा सध्या सुरु असलेल्या भाद्रपदाशी काही देणे-घेणे नाही. हे बारमाही दृष्य आहे. हे श्वान रात्रीच्या जागरणानंतर भल्या पहाटे या चौकात एकत्र येऊन आपापल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार भू ऽऽ भू ऽऽ करुन माणसांच्या टोळ्यांना आव्हान देत दहशत निर्माण करीत, ‘अपनी टोली जिंदाबाद’ म्हणत असतील तर तो त्यांचाही माणसांप्रमाणेच हक्कच म्हणावा लागेल. या  दृष्याचा भित-भित का होईना पण ‘मॉर्निंग वॉक’ वाले आपापल्या शरीरप्रकृती व कुवतीनुसार अनुभव घेत असतात. त्यातच चौकाजवळच्या रिक्षा स्टॉपच्या झाडाखाली बसुन भल्या पहाटे या श्वानांना जवळच असलेल्या बेकरीतील पाव व बिस्कीट खाऊ घालणाऱ्या श्वानप्रेमी दानींची येथे कमी नाही. भल्या पहाटे दोघेही दाता आणि खाता एकमेकांच्या प्रतिक्षेतच असतात. अर्थात पार्ले कंपनीची महागडी (!) बिस्कीटे खाऊ घातल्याने प्रकृती सुधारते की बिघडते? हे जनावरांचे डॉक्टरच अधिकृतपणे सांगु शकतील. यात बिस्कीट दानींचा संबंध फक्त पुण्यांपुरताच असतो. या श्वानांचे विशेष म्हणजे त्यांना टाकलेली भाकरी-पोळी ते खात नाहीत, फक्त हुंगतात; मात्र पाव बिस्कीटांवर मिष्टान्न समजून तुटून पडतात.

साक्री रोड परिसरातील जागरुक नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी नुकतीच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन एकदा दुचाकीने प्रवास करून साक्री रोडच्या एकूणच प्रकृतीची तपासणी करण्याची विनंती केली. हर्षकुमार व पथदिव्यांसाठी आयुक्तांना  भेटलेले नगरसेवक किरण अहिरराव यांच्या भूमिका नक्कीच स्वागतार्ह आहेत. त्यांचा रस्त्यासाठी व पथदिव्यांसाठी संघर्ष सार्वजनिक बांधकाम विभागाशी असला तरी महापालिकेच्या सत्तास्थानी त्यांचा पक्ष असल्यामुळे अन्य सोयी सुविधांबाबत त्यांना स्वकीयांशीही लढण्याची तयारी ठेवावी लागेल. जिल्हाधिकारी साहेब, आपण नक्कीच दुचाकीने या, जमले तर पालिकेच्या नवनियुक्त आयुक्तांनाही सोबत घेऊन या. येतांना थोडी काळजी घ्या. कारण आपण दोघेही नवनियुक्त अधिकारी धुळे शहरासाठी अनोळखी आहात. त्यामुळे तुम्हाला पाहून या श्वानांना जास्त जोर चढेल, पण साहेब अजिबात घाबरु नका. कारण ‘भोंकनेवाले कभी काटते नहीं’ , ‘ओ अपनी अपनी गलीके शेर होते है’ आणि साहेब आणखी एक विनंती आहे. केवळ विद्येचे वर्धन व्हावे यासाठीच स्थापन झालेल्या विद्यावर्धिनी कॉलेजलगत वाहणाऱ्या नाल्याचीही अवश्य पाहणी करा. अर्थात सोबत प्रकाशासाठी टॉर्च ठेवा.  नाल्यात नेमके कशाचे वर्धन (!) सुरु आहे कळायला वेळ लागणार नाही. कृपया सोबत नाल्याची पाहणी करतांना कुठलीही मुखपट्टी लावू नका. म्हणजे साक्री रोडच्या आरोग्याची मलमपट्टीही कळुन चुकेल.  आणि धुळे शहरात सर्वाधिक डेंग्युचे बळी आणि रुग्ण साक्री रोड परिसरातील असले तरी नाल्याची पाहणी करतांना त्या डेंग्युच्या डासांनाही घाबरु नका, त्यांच्यासाठीही आपण नवनियुक्त आहात. आम्ही साक्रीरोडवाले त्या डासांसाठी बळीचे बकरे आहोतच त्याची फिकीर तुम्ही करू नका. पण साहेब ‘आम आदमी’ चे रुप घेऊन यावेच. एकेकाळी वृक्षराजींनी नटलेल्या, मनमोहक व रौनक असलेल्या साक्रीरोडचा पन्नास वर्षांपासूनचा साक्षीदार नागरिक या नात्याने आपणास मी विनंती करीत आहे. साक्री रोडवर आपले स्वागतच आहे.

- गो. पि. लांडगे,

ज्येष्ठ पत्रकार, धुळे.  (मो. 9422795910)

 

 




Post a Comment

0 Comments