Header Ads Widget

ग्रामीण पत्रकारांना अधिस्विकृती कार्ड, पत्रकारांच्या कुटुंबियांना पी.आय.बी. ची मदत मिळविण्याच्या प्रयत्नांसह पत्रकारांच्या पेन्शनच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तातडीने निपटारा करू पुण्याचे नूतन माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांची सातारा जिल्हा पत्रकार संघाला ग्वाही




धुळे - मराठी पत्रकार परिषदेच्या सातारा जिल्हा पत्रकार संघाने सुचवल्या नुसार  सातारा जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्या पत्रकारांच्या  कुटुंबाना केंद्र सरकारच्या पी.आय.बी. मार्फत मदत करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करु,जेष्ठ पत्रकारांच्या पेन्शन योजनेच्या प्रलंबित  प्रश्नाचा तातडीने निपटारा करु, ग्रामीण भागातील पत्रकांराना आधिस्वीकृती कार्ड कसे देता येईल याचा पाठपुरावा करु अशी ग्वाही पुणे विभागीय  नूतन माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांनी दिली. डॉ. राजू पाटोदकर यांनी दिलेल्या आश्वासनाचे वृत्त वाचून अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख  यांनी स्वागत केले असून अधिकाऱ्यांकडून  उक्ती आणि कृतीची सांगड घालण्याची अपेक्षा व्यक्त करीत सकारात्मक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना परिषदेचा पाठींबाच राहील असे देशमुख यांनी नमूद केले.

सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने तेथील जिल्हा माहिती कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित बैठकीत डॉ. पाटोदकर बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, दै.पुढारीचे ब्युरो मॅनेजर  जीवनधर चव्हाण, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, दूरचित्रवाणी सहनियंत्रण समितीचे सदस्य तुषार तपासे, सोशल मिडियाचे अध्यक्ष सनी शिंदे, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे ओंकार कदम, अमित वाघमारे, भाऊ चिंचकर ,विकास धुळेकर उपस्थित होते..

  यावेळी  सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी सांगितले की, कोरोना कालावधीत जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या पत्रकारांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा पत्रकार संघाने पत्र दिले आहे. मात्र अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही, त्यांच्या कुटूंबियांना धीर देण्यासाठी यावर  तात्काळ निर्णय घेतला जावा, राज्य व केंद्र शासनाच्या योजनांमधून ही  मदत मिळावी, जेष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू करण्यास विलंब होत आहे त्याबाबतही सकारात्मक भूमिका घेउन राज्य शासनाकडे या बाबत पाठपुरावा व्हावा, ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती ची खरी गरज आहे त्यामुळे अधिस्वीकृती निकषांमध्ये योग्य ते बदल करून जास्तीत जास्त पत्रकारांना त्याचा लाभ होण्यासाठी निर्णय घेतला जावा असे सुचवले. यावर डॉ पाटोदकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व विषयांमध्ये आपण स्वतः लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली. पत्रकारितेतूनच आपले करिअर सुरू झाल्याने त्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव आहे, सातारा जिल्ह्यातील पत्रकार संवेदनशील असल्याची आपणाला माहिती आहे, जिल्हा पत्रकार संघाचे घेतलेली भूमिका निश्चित चांगली आहे, प्रशासनाला पूरक असे काम येथील मीडियाचे आहे. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यास आपला प्राधान्यक्रम राहील, असेही पाटोदकर यांनी सांगितले.

 




Post a Comment

0 Comments