Header Ads Widget

अपर तहसीलदार महाजन यांना धमकी देणाऱ्यास अटक करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी



चिमठाणे : दोंडाईचा येथील अपर तहसीलदार सुदाम महाजन यांना ठार करण्याची धमकी दिलेल्या गौण खनिज माफियांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिंदखेडा तालुका तलाठी संघाने गुरुवारी (ता.९) सायंकाळी शिंदखेडा तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिंदखेडा तालुका तलाठी संघातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ७ डिसेंबरला दोंडाईचा अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी रुदाणे (ता. शिंदखेडा) येथे लामकानी (ता. धुळे) रस्त्यालगत अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या गौण खनिज माफियांनी अपर तहसीलदार महाजन, तलाठी व इतर महसूल कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालत अवैध वाहतूक करणारे वाहन शिंदखेडा पोलिस ठाण्यात कारवाईसाठी नेताना गौण खनिज माफियांनी रस्त्यात अडवून अरेरावी करीत अश्लील शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी देत जेसीबी व दोन ट्रॅक्टर पळवून नेत खोटे आरोप करून जातिवाचक शिवीगाळ करण्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तीक्ष्ण हत्याराने ठार करण्याची धमकी देणाऱ्या व अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफियांविरोधात कडक कारवा कारवाईची मागणी करण्यात आली.

यापुढे गौण खनिज कारवाई करताना पत्रकारांसह हत्यारबंद पोलिस संरक्षण पुरविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी शिंदखेडा तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष संजीव गोसावी, चिटणीस मनोहर पाटील, मनोज गोसावी, एस. एस. पाटील, दीपक भगत, आर. डी. पवार, पंकज अहिरराव, यू. बी. मोरे, रोहिदास कोळी, नीलेश मोरे, एस. एस. कोकणी, तुषार पवार, एन. एस. माळी, पी. के. धनगर, एस. जे. नेरकर, पंकज पाटील, नारायण माजलकर, सुरेश काकडे, व्ही. एस. जगदाळे, विजय बोरसे, भूपेश कोळी, महिला तलाठी ममता ठाकरे, रीना खिल्लारे, अर्चना पौल, रत्ना राजपूत, कविता पाटील, बी. एल. बाविस्कर, विकास सिंगल, मनोज साळवे यांच्यासह तलाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरोड्याच्या वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल

रुदाणे येथे अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी गुरुवारी (ता. ९) शिंदखेडा पोलिसांनी ट्रॅक्टरमालक विजय पाटील (रा. लामकानी), ट्रॅक्टरचालक शंकर पांडू भिल, ट्रॅक्टरचालक नाना हिलाल पवार (दोघे रा. रुदाणे, ता. शिंदखेडा), ट्रॅक्टरमालक प्रकाश मगन पाटील (रा. लामकानी, ता. धुळे), जेसीबी मशिनचालक लक्ष्मण ओराम, गोविंदा नगराळे (रा. वाडी, ता. शिंदखेडा) व १० ते १२ अनोळखी व्यक्तींवर दरोड्याच्या वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दोंडाईचा अपर तहसीलदार सुदाम महाजन यांच्यावर गौण खनिज माफियांनी केलेल्या हल्ला प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार यांच्याशी चर्चा करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

-जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे

Post a Comment

0 Comments