Header Ads Widget

*बालकांकडून चोऱ्या व गुन्हे करवून घेणारे पालकच गजाआड झाले पाहिजेत!*



*धुळे* शहरात बड्या विवाह समारंभात टापटीप वऱ्हाडी  बनून घुसून सोन्याचे दागिने व किमती वस्तू पळविण्याच्या बऱ्याच घटना यापूर्वी घडल्या आहेत . याच बरोबर लहान अल्पवयीन मुलांना पुढे करून  पद्धतशीर पणे सतत चोर्‍या करणारी मंडळीही येथे अस्तित्वात आहेत . बऱ्याचदा बाहेरच्याही टोळ्या धुळे , नंदुरबार , जळगाव, नाशिक भागात कार्यरत असतात. धुळ्यात तर महिलांना पुढे करून चोऱ्या मार्‍यांसह हनी ट्रॅप लावून ब्लॅक मेल करणाऱ्या काही खास टोळ्या कार्यरत आहेत . त्यांची शिकार नोकरपेशा नागरिक , विशेषतः शिक्षक , प्राध्यापक , डॉक्टर , आणि भ्रष्ट्राचाराची खूप खात असणार्‍या आरटीओ वगैरे खात्यातले अधिकारी हे असतात . इभ्रत व नोकरी जाण्याच्या भितीने असे कर्मचारी अधिकारी  त्यांच्यासाठी थैली मोकळी सोडवयास लवकर तयार होत असतात . काही मंडळी हुशार असतात . हनी ट्रॅप वाले  आता वारंवार ब्लॅकमेल करतील, हा विचार करून त्या टोळीची सुपारीच दुसऱ्या टोळीला देवून टाकतात . धुळे शहरात चोर्‍यांसाठी लहान मुलांचा ट्रेंड कधिपासून आला आहे . जागेवर लहान अल्पवयीन मुले चोरीचे काम करतात . काही अंतरावर त्यांचे हे बडे चोर उभे असतात . लहान मुलगा पकडला गेला तरी हे पुढे येवून ' जावू द्या जावू द्या , लहान आहे ' असे म्हणून पळवून लावतात . पकडलेला चोर अल्पवयीन असल्याने मोठ्या चोरास ज्याप्रमाणे पब्लीक मार बसतो तसा या अल्पवयीन चोरास बसत नाही . शिवाय पोलिसांनी पकडले तरी ज्युवेनाईल आरोपी म्हणून त्याची रवानगी पोलिस कस्टडी , न्यायालयीन कस्टडी ऐवजी सुधार गृहात होते व तेथे समुपदेशन होवून काही दिवसात त्याची सुटका होते . बऱ्याचदा सुधार गृहातून बाहेर आल्यावर त्याचे पालक पुन्हा त्यास याच धंघात लावत असल्याचे स्पष्ट होते . धुळ्याच्या सुधार गृहातून सुटलेल्या अशाच एका अल्पवयीन मुलाने पुन्हा औरंगाबादेत एका विवाह समारंभात तब्बल ३६ लाख रुपयांचे दागिने घेवून पोबारा केल्याचे प्रकरण समोर आले आहे . औरंगाबादला सुर्या लॉन्स मध्ये मंगळवारी विवाह निमित्त संगित रजनीचा कार्यक्रम होता . त्यात  वऱ्हाडी पैकी  असल्याचे भासवत  १३ वर्षाच्या एका मुलाने तब्बल ३६ लाखाचे दागिने असलेली बॅग लंपास केली . ती घटना सीसी टीव्हीत रेकॉर्ड झाली . त्यावरून हा मुलगा म . प्र . मधील पचौरचा असल्याचे  पोलिसांच्या लक्षात आले . या मुलाने धुळ्यात देखील एका लग्न समारंभात याच प्रकारे दागिने लंबविले होते . दि . २ जुलै २०२१ रोजी धुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले होते . त्याची धुळ्यात बालनिरीक्षण गृहात रवानगी झाली होती . त्याचे पुनर्वसन करण्यासाठी त्याचे बाल न्याय मंडळात जवळपास महिनाभर समुपदेशन देखील झाले होते . त्या वेळी त्याच्या पालकांनी कोर्टात अर्ज केला . तो फेटाळल्यावर त्यावर पुन्हा अर्ज केला . त्यात त्याला पालकांच्या स्वाधीन करण्याचा आदेश झाला . पालकांच्या ताब्यात आल्यानंतर  पालकांनी त्याला पुन्हा त्याच कामास जुंपले असल्याचा या प्रकरणात  संशय आहे . या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित होतो . अल्पवयीन बालकांना  कस्टडी दिली जात नाही . कोर्टात  शिक्षा होत नाही . या सवलतीचा लाभ घेवून त्यांना चोरी सारखी गुन्हेगारी कृत्ये करण्यासाठी वापरण्याची प्रवृत्ती समाजात वाढीस लागलेली आहे . ही बाब व्यापक प्रमाणात  लहान मुलांच्या भवितव्याच्या  हष्टिने देखील फार धोकेदायक आहे . अशाने लहान पणापासूनच मुलांमध्ये शातीर चोर बनण्याचे स्कील त्या त्या पालकांकडून डेव्हलप केले जाण्याचाही मोठा धोका संभवतो . त्यामुळे जे पालक  वारंवार व प्रोफेशनल पद्धतीने याप्रकारे लहान मुलांचा चोर्‍या व गुन्ह्यांसाठी वापर करतात, त्यांच्यासाठी नव्याने कायदा तयार करणे किंवा विद्यमान कायद्यात नव्याने कलमे समाविष्ट करणे गरजेचे झाले आहे . केंद्रिय वाहन कायद्यात ज्या प्रकारे एखाद्या अल्पवयीन मुलाने गाडी चालवून अपघात केला तरी त्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या पालकाला देण्याची तरतुद करण्यात आली आहे . त्याच प्रकारे पालकांच्या सपोर्टने अल्पवयीन मुलाने चोरी केली तरी ती त्याच्या पालकानेच केली आहे,  असे गृहित धरून पालकांना शिक्षेची तरतुद केली पाहिजे . अल्पवयीन मुलाने गाडी चालवून अपघात करणे, ही बाब तशी हेतूतः प्रोफेशनली  केलेला गुन्हा नसतो . तरी त्यात पालकास शिक्षा होवू शकते . तर मग ठरवून , हेतूतः  प्रोफेशनली आपल्या अल्पवयीन बालकांना चोरी व अन्य गुन्हे करावयास लावून त्याचे लाभ उपभोगणाऱ्या त्याच्या पालकांवर त्या गुन्ह्याची कायदेशीर जबाबदारी कां टाकण्यात येवू नये ? हा प्रश्न असे वाढते प्रकार पाहता उपस्थित होवू शकतो . राज्याच्या ' लॉ अॅन्ड ज्युडिशिअरी डिपार्टमेंटने व गृहखात्याने या मुद्यावर गांभिर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे . 
*दै. पथदर्शी, साभार

Post a Comment

0 Comments