सोलापूर : राज्यातील १७ जिल्हा परिषदांमधील आणि तीन जिल्हा परिषदांमधील पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांची निवडणूक आता दोन टप्प्यात होणार आहे.
पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी होणार आहेत. दुसरा टप्पा न्यायालयाच्या निर्णयानंतर होईल, असे राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. तर अहिल्यानगर, जालना व बीड या जिल्ह्यातील ८८ पंचायत समित्यांमध्ये ओबीसींचे आरक्षण २७ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निर्णयानंतरच होतील.
तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दिलेली मुदत ३१ जानेवारीपर्यंतच आहे. त्यामुळे मुदतीपूर्वीच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. ३१ जानेवारीपूर्वीच या निवडणुका संपतील, असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.
आता 'या' जिल्हा परिषदांची निवडणूक
सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव व लातूर या १२ जिल्हा परिषदा व त्या जिल्ह्यातील १२५ पंचायत समित्यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका दुसऱ्या टप्प्यात होतील, पण त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शन मागविले आहे.
५ जानेवारीपासून भरता येईल झेडपीसाठी अर्ज?
महापालिकेसाठी उमेदवारांना २३ ते ३० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. २ जानेवारीला अर्ज माघार आणि ३ जानेवारीला चिन्हवाटप होऊन प्रचाराला सुरवात होईल. तत्पूर्वी, जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. दरम्यान, ज्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका नाहीत, तेथील अधिकारी उपलब्ध करून २१ दिवसांत १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. ५ जानेवारीपासून उमेदवारांना अर्ज भरता येईल, जेणेकरुन मुदतीत निवडणूक संपतील, असे आयोगाचे नियोजन आहे.
१२ जिल्हा परिषदांची पहिल्या टप्प्यात निवडणूक
आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या १२ जिल्हा परिषदा व तेथील पंचायत समित्यांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत होतील. बाकीच्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार घेतल्या जातील.
- सुरेश काकाणी, सचिव, राज्य निवडणूक आयोग
'झेडपी'चा पहिला टप्पा असा...
एकूण जिल्हा परिषदा
१२
निवडणूक कालावधी
२१ दिवस
निवडणुकीचे संभाव्य दिवस
५ ते २७ जानेवारी
0 Comments