Header Ads Widget

नवीन रेल्वे मार्ग. जळगावहून अमळनेर, नरडाणामार्गे धुळ्याला प्रवास करता येणार !


जळगाव: खान्देशातील जळगाव आणि धुळे दोन मोठ्या शहरांना जोडणारा थेट महामार्ग उपलब्ध असला, तरी रेल्वे मार्ग अस्तित्वात नाही. त्यामुळे रेल्वेने जळगावहून धुळ्याला जायचे म्हटल्यास चाळीसगावमार्गे फेऱ्याने जावे लागते.

या पार्श्वभूमीवर धरणगाव, अमळनेर, बेटावद, नरडाणामार्गे थेट जळगाव-धुळे रेल्वे गाडी भविष्यात सुरू होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्रातील दोन तसेच मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांमधील जमिनींची संपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. मनमाड-धुळे-इंदूर, असा एकूण सुमारे ३०९ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग केंद्राच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. या मार्गासाठी अंदाजे १८ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे जवळपास एक हजार गावे जोडली जाणार असून, तब्बल ३० लाख लोकसंख्येला त्याचा लाभ मिळणार आहे. प्रस्तावित मनमाड-इंदूर हा रेल्वे मार्ग पश्चिम रेल्वेच्या भुसावळ-उधना रेल्वे मार्गाला नरडाणा स्थानकावर क्रॉस करणार आहे. साहजिक नरडाणा स्थानकावर चौफुली तयार होणार असून, तेथून उधना, जळगाव, धुळे, शिरपूर-इंदूरकडे रेल्वेने जाण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

सध्या जळगाव-धुळे दरम्यान थेट रेल्वे सेवा नाही. प्रवाशांना जळगावहून धुळे जाण्यासाठी मुंबई मार्गावरील चाळीसगाव स्थानकावर उतरावे लागते. तेतून नंतर चाळीसगाव-धुळे गाडी पकडावी लागते. जळगाव-चाळीसगाव-धुळे प्रवासासाठी जवळपास १५० किलोमीटर अंतर आणि अडीच तासांचा वेळ सहज लागतो. याशिवाय, चाळीसगाव-धुळे दरम्यान रेल्वे गाड्यांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे प्रवाशांसमोर रस्तेमार्गे जळगावहून धुळे गाठण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यासाठी वेळेसह पैशांचा मोठा अपव्यय होतो. महामार्गावरून प्रवास करताना वाहतूक कोंडीसह अपघातांची शक्यता वाढते. ही स्थिती लक्षात घेता जळगावहून धरणगाव, अमळनेर, बेटावद, नरडाणामार्गे धुळे धावणाऱ्या रेल्वेचा पर्याय भविष्यात खूपच फायदेशीर ठरणार आहे.


पश्चिम रेल्वेच्या भुसावळ-उधना मार्गावरील जळगाव ते नरडाणा या दोन स्थानकांचे अंतर जवळपास ८० किलोमीटर आहे. जळगावहून नरडाणासाठी एक्स्प्रेसने प्रवास केल्यास दीड तास आणि पॅसेंजरने प्रवास केल्यास दोन तास लागतात. प्रस्तावित मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर नरडाणा ते धुळे हे अंतर ३५ किलोमीटरवर येणार आहे. नरडाणाहून धुळे गाठण्यासाठी एक तासाचा प्रवास गृहीत धरला तरी जळगावहून अमळनेर, नरडाणामार्गे धुळे जाण्यासाठी पॅसेंजर गाडीने फार तर तीन तास लागतील. मात्र, रेल्वेने प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. धरणगाव, अमळनेर, बेटावद, नरडाणा येथून धुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी हा नवीन मार्ग खूपच सोयीचा ठरेल. त्या दृष्टीने भविष्यात नरडाणा स्थानकालगत जळगाव-धुळे नवीन रेल्वेसाठी वळण मार्ग उभारण्याचा विचार रेल्वे प्रशासन करू शकते.

Post a Comment

0 Comments