राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आपल्या प्रलंबित मागण्या शासनाने तात्काळ सोडवून त्यांना न्याय द्यावा.
या मागणीसाठी यशवंत स्टेडियम,धनतोली,नागपूर येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे(धुळे ),संजय मापले (अमरावती),जयश्री वाबळे(अहिल्यानगर), रामकृष्ण बी.पाटील(जळगांव ) यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सुमारे एक हजार अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधीनी धरणे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले.
*मागण्या*
1) अंगणवाडी सेविका मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतन व भत्ते लागू करण्यात यावे.
2) केंद्र सरकारने महागाईचा विचार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ करावी.
3) सेविका मदतनीसांना कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता न देता दरमहा मानधनाला सरसकट जोडण्यात यावा.
4) मा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅच्युटी लागू करावी.
5) अंगणवाडी सेविका मदतनीसांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावी.
6) FRS करतांना सेविकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यात याव्यात.
7) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामाचा थकीत मोबदला अदा करावा.
8) अंगणवाडी सेविका मदतनीसांना पंधरा दिवसांऐवजीएक महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार श्री.आमश्या दादा पाडवी(अक्कलकुवा),आमदार श्री.रवी राणा(बडनेरा),आमदार श्री.अमोल दादा पाटील(एरंडोल-पारोळा) यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा असून त्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील असे आश्वाशित केले.
त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभागाचे उपसचिव श्री.विलास ठाकूर यांच्यासह कक्ष अधिकारी श्री. जाधव यांनी श्रीमती जयश्री वाबळे,रामकृष्ण बी.पाटील,संजय मापले यांच्या शिष्टमंडळाशी नवीन हैद्राबाद भवन नागपूर येथे चर्चा केली.
सदर चर्चेत अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दिला जाणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषावर फेरविचार केला जाईल, सेवानिवृत्ती वेतन, आणि ग्रॅच्युटी आणि आजारपणाची भरपागारी रजा लागू करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे तसेच सेविकांना अंगणवाडी केंद्राचे काम सुलभ व्हावे.
यासाठी अद्यावत मोबाईल आणि सिमकार्ड घेण्यासाठी अंगणवाडी निहाय निधी दिला जाईल,अंगणवाडी सेविकांना FRS,पोषण ट्रॅकर आणि ऑनलाईन कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी प्रकल्प स्तरावर कर्मचारी नियुक्त केले जाणार असल्याचे सांगितले.
गुजरात उच्च न्यायालयच्या निकालानुसार अंगणवाडी सेविका मदतनीस यांना अनुक्रमे 24800/- आणि 20400/- रुपये वेतन लागू करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून निश्चित विचार केला जाईल असेही श्री.ठाकूर यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
चर्चा सकारात्मक झाल्याने धरणे आंदोलन यशस्वी झाल्याचे समन्वय समितीने जाहीर केले.धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राजू पाटील,गोवर्धन मिसाळ, चंदाताई नवले,वकील पाटील,आशा जाधव,अमोल बैसाणे,शालिनी देशमुख,संध्या पाटील यांनी प्रयत्न केला.
0 Comments